सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोदी सरकारवर शाब्दिक वार करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भाजपने आव्हान दिले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात राहुल गांधी यांनी किमान १० ओळी बोलून दाखवावे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार कोणालाच नाही : प्रियांका गांधी
नड्डा म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायदा काय आहे यावर राहुल गांधींनी १० ओळी बोलून दाखवावे. यातील दोन ओळी त्यांनी या कायद्यामुळे देशाला कोणती हानी पोहचणार आहे, हे देखील सांगावे, असे नड्डा म्हणाले. ते पुढे म्हणाले, देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना सुधारित नागरिकत्व कायद्यातील तरतूदीची समज नसणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या कायद्याच्या विरोधात मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. देशाच्या संपत्तीचे नुकसान झाल्यानंतर राहुल गांधींनी काही प्रतिक्रिया दिली का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांची भूमिका देशाच्या हिताची नसल्याचे म्हटले.
NRC बद्दल खोटे कोण बोलले? PM मोदी की शहा, काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ
काँग्रेस आणि भाजप यांच्यात वैचारिक लढाई असू शकते. त्यांची (राहुल गांधी) वैचारिक समज आमच्यापेक्षा कमी असू शकते. पण हिंसेविषयी त्यांना मौन बाळगणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करत नड्डा यांनी राहुल यांच्या भूमिकेवर हल्ला चढवला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावर काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन राजकारण करत असल्याचा आरोपही नड्डा यांनी केला. राहुल गांधी यांना १९४७ चा इतिहास ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी विभाजनावेळी अनेक लोकांवर अत्याचार झाल्याचे सांगत त्यांनी सुधारित नागरिकत्वाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.