पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी माफी, मगच प्रचार; भाजपच्या नेत्यांनी प्रज्ञासिंह यांना सुनावले

प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्यांनी केलेली वक्तव्ये चांगलीच महागात पडली असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. आता प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत मुस्लिमांची आणि मुंबई दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालिन प्रमुख शहीद हेमंत करकरे यांची माफी मागणार नाही, तोपर्यंत त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजपच्या मध्य प्रदेशमधील मुस्लिम नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी दिल्यापासून भाजपवर विविध स्तरांतून टीका होते आहे. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांना दिलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. भोपाळमध्ये येत्या १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेली वक्तव्ये त्यांचे स्वतःचे मत आहे. भाजप त्याच्याशी सहमत नाही, असे पक्षाने स्पष्ट केले असले, तरी हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत गाजतो आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असे भाजपने म्हटले आहे. मात्र, आता भाजपच्या मुस्लिम नेत्यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या माफीची मागणी केल्यामुळे पक्षापुढील अडचणीत वाढच झाली आहे. 

आपण शाप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला, असे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. प्रज्ञासिंह ठाकूर या २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बाँम्बस्फोटातील आरोपी आहेत. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास हेमंत करकरे हेच करीत होते. आणि त्यांनीच प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक केली होती. स्फोटासाठी वापरण्यात आलेली दुचाकी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर नोंदलेली असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.