पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच, सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य

राहुल गांधी

महाराष्ट्र आणि हरियाणात होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढे येऊ घातलेल्या अन्य राज्यातील निवडणुका काँग्रेस जिंकण्याची शक्यता कमीच असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सूचित केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा खंबीरपणे आपला आवाज उठवायला वेळ लागतो आहे. त्यातच पक्षाला एका मागून एक धक्के बसताहेत. त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर होत असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. 

'सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने ओबीसींसाठी खूप कामं केली'

मेमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला ३०३ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार सत्तेवर आले. आता येत्या २१ तारखेला महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभेची निवडणूक होते आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशातील महत्त्वाच्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचा हंगामी कार्यभार सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे हरियाणामध्ये पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सूचविलेल्या इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

पाकमधून अजून एक ड्रोन पंजाबमध्ये घुसल्याने सुरक्षाव्यवस्था आणखी सतर्क

उत्तर प्रदेशात सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात तेथील आमदार असलेल्या आदिती सिंग यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. प्रियांका गांधी यांनी काढलेल्या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतला नव्हता. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सलमान खुर्शीद म्हणाले, आमचा पराभव नक्की कशामुळे झाला, याचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही अजून एकत्रच आलेलो नाही. आमचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमचा नेताच पदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे पक्षात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. सोनिया गांधी सध्या अध्यक्ष आहेत. पण त्या हंगामी अध्यक्ष म्हणूनच कारभार सांभाळत आहेत.