पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला - रणदीप सुर्जेवाला

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत देऊ केला होता. पण कार्यकारिणीने तो तात्काळ एकमताने फेटाळला. काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. असे कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी एकमताने सांगितले, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दिली.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुर्जेवाला यांनी बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आलेल्या ठरावाचे वाचन केले. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने दिलेला जनादेश पक्षाने विनम्रपणे स्वीकारला आहे. यापुढेही विरोधी पक्षात बसून देशवासियांचे प्रश्न मांडत राहण्याचे पक्षाने ठरविले आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आवश्यक बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंधनाचे वाढते भाव, दुष्काळामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील कृषिसंकट, वाढत्या अनुत्पादित कर्जांमुळे बॅंकांपुढे असलेले संकट या सगळ्यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी भाजपच्या सरकारकडे करण्यात येत असल्याचे कार्यकारिणीच्या ठरावात म्हटले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शनिवारी नवी दिल्लीमध्ये झाली. 

राज्यातल्या पराभवाला मी जबाबदार- अशोक चव्हाण

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, शीला दीक्षित, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, अमरिंदर सिंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. बंद खोलीत झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर यश मिळाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ जागांवर यशस्वी ठरला होता. यावेळी त्यामध्ये फार थोडी वाढ झाली आहे. सलग दहा वर्षे सत्तेतून बाहेर राहण्याची वेळ काँग्रेसवर या निवडणुकीतील पराभवामुळे ओढवली आहे. या सगळ्याची चर्चा बैठकीत झाली.