पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटलींची नव्या सरकारमधून तूर्त माघार

अरूण जेटली

मावळत्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद सांभाळणारे अरूण जेटली यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे नव्या सरकारमध्ये आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र पाठविले असून, त्यामध्ये आपल्याला दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. तूर्त तरी आपण स्वतःच्या तब्येतीकडे अधिक लक्ष देणार असल्याचे सांगत त्यांनी नव्या सरकारमधून तूर्त माघार घेतली.

मधुमेह आणि इतर आजारांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अरूण जेटली यांच्यावर सातत्याने उपचार सुरू आहेत. उपचारांसाठी त्यांना काहीवेळा परदेशातही जावे लागले होते. फेब्रुवारी महिन्यात अरूण जेटली यांची तब्येत ठीक नसल्यामुळे पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत मांडला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही अरूण जेटली यांनी फारसा सहभाग घेतला नव्हता. ते ट्विटरच्या माध्यमातून प्रचारातील मुद्द्यांवर आपली मते मांडत होते. अखेर बुधवारी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याला सरकारच्या जबाबदाऱ्यांमधून तूर्त मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. 

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राची प्रत त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरही प्रसिद्ध केली आहे. गेल्या १८ महिन्यांपासून माझ्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढउतार होत आहेत. विविध आजारातून औषध उपचार करून डॉक्टरांनी मला सुखरूप बाहेर काढले आहे. पण यापुढे माझ्यावर सोपविण्यात येणारी जबाबदारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पूर्ण करणे तूर्त शक्य होणार नाही. त्यामुळे मला उपचारांसाठी वेळ दिला जावा. माझ्यावर नवीन कोणतीही जबाबदारी टाकली जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Arun Jaitley opts out of PM Modis new team ahead of swearing in ceremony cites health grounds