पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्कुटीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी जामियाच्या प्रवेशद्वारावर केला गोळीबार

स्कुटीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी जामियाच्या प्रवेशद्वारावर केला गोळीबार

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वार क्रमांक पाचवर रविवारी रात्री १२ च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. स्कुटीवरुन आलेल्या दोघा जणांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार करुन हे हल्लेखोर पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. गेल्या काही दिवसांत गोळीबाराची घडलेली ही तिसरी घटना आहे. 

रविवारी रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारानंतर हल्लेखोर लाल स्कुटीवरुन पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गोळीबारानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये पळापळ झाली. पोलिस तैनात असतानाही गोळीबाराची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून आली. गोळीबारानंतर नाराज विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलिस स्थानकाबाहेर आंदोलन केले. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आंदोलक विद्यार्थी तेथून निघून गेले.

याप्रकरणी सहाय्यक आयुक्त जगदीश यादव यांनी घटनेबाबत सांगितले की, आम्ही जबाब नोंदवून घेतला आहे. त्या आधारावर आयपीसी कलम ३०७ आणि आर्म्स एक्ट कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांचे पथक गेले आहे. प्रवेशद्वार क्रमांक ५ आणि ७ येथून सीसीटीव्ही फुटेज मिळवले जात आहेत. त्यानंतरच तथ्ये समोर येतील. त्यानंतर त्याचीही गुन्ह्यात नोंद होईल आणि कारवाई केली जाईल.