पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एव्हरेस्टवर नेमकं काय घडलं, महिला गिर्यारोकानं सांगितला जीवघेणा अनुभव

अमिशा चौहान

गेल्या काही दिवसांपासून माऊंट एव्हरेस्ट हा तिथे झालेल्या गिर्यारोहकांच्या मृत्युमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. एव्हरेस्ट सर करायला गेलेल्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती. ८ भारतीय गिर्यारोहकांसह एकूण १६ जणांचा बळी  गेल्या आठवड्यापर्यंत एव्हरेस्टनं घेतला. तर काही अक्षरश: मरणाच्या दारातून परतले. 

भारतीय महिला गिर्यारोहक अमिशा चौहान एव्हरेस्टवरील मानवी कोंडीतून थोडक्यात बचावली. अतिथंडीमुळे तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. ती सध्या काठमांडूमधल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. एव्हरेस्टवर केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच जाण्याची  परवानगी द्यावी, येथे चढाईचं अत्यल्प प्रशिक्षण घेतलेल्या कोणत्याही गिर्यारोहकाला परवानगी देऊ नये' असं स्पष्ट मत तिनं मांडलं आहे. 

का होत आहेत माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकांचे मृत्यू?

'एव्हरेस्टची चढाई करण्यात आलेल्या गिर्यारोहकांपैकी शेकडो  गिर्यारोहकांकडे चढाईचं  कोणतंही प्रशिक्षण नव्हतं. या नवख्या गिर्यारोहकांनी फक्त स्वत:चीच नाही तर त्यांच्यासोबत असणाऱ्या शेर्पा गाइडचंही आयुष्य धोक्यात घातलं.' अमिशा, पीटीआयशी बोलताना एव्हरेस्टवरचा  अनुभव सांगत होती.

'काही गिर्यारोहकांना चढाई करतानाच्या साध्या गोष्टीही ठावूक नव्हत्या ते प्रत्येक गोष्टींसाठी त्यांच्या गाइवर विसंबून होते. केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच चढाईची  परवानगी द्यायला हवी असं मला वाटतं' ती म्हणाली. 'एका व्यक्तीच्या चुकींमुळे अनेकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. काही गिर्यारोहकांचा ऑक्सिजन संपला होता. काहीजणांनी स्वत:च्या निष्काळजीमुळे प्राण गमावले. तर काहीजण ऑक्सिजन संपला असतानादेखीत  वर जाण्याचा अट्टहास करत होते'  एव्हरेस्ट सर करण्यासाठी गिर्यारोहक स्वत:चा जीव कसा धोक्यात घालत होते हे आमिशानं स्वत:च्या डोळ्यानं पाहिलं होतं म्हणूनच तिनं  केवळ प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच चढाईची परवानगी देण्याची मागणी केली.

जस जस एव्हरेस्टवर चढत जाऊ तसा हवेतील प्राणवायू कमी होत जातो. ही अंतिम टप्प्यातील चढाई डेथ झोन म्हणूनही ओळखली जाते. यंदा एव्हरेस्टवर मानवी कोंडी झाली होती. या कोंडीत अडकून पडल्यानं कित्येक गिर्यारोहकांचा ऑक्सिजन संपला, काही थकावा जाणवून आजारी पडले नंतर श्वसनाचा  त्रास होऊ  लागल्यानंही अनेकांनी जीव गमावले. 

एका महिला फिल्ममेकर गिर्यारोहकालाही याहून भयंकर अनुभव  आला. तिथ फक्त मृत्यूचं सावट होतं.  सगळीकडेच गोंधळ होता, मृतदेह  पडले होते. काही लोक  या  मृतदेहावर पाय ठेवूनच पुढे जात होते. ते सारं काही भयंकर होतं  मी  आयुष्यात कधीही तिथे परत जाणार नाही असं फिल्ममेकर इलिया म्हणाली.