एनडीएच्या मागील सरकारमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. डोवाल यांची पुनश्च ५ वर्षांसाठी एनएसए म्हणून नियुक्ती केली आहे. पुनर्नियुक्तीसह डोवाल यांना 'प्रमोशन' ही देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेतील त्यांचे योगदान पाहता त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
NSA Ajit Doval given Cabinet rank in Government of India in recognition of his contribution in the national security domain. His appointment will be for five years. pic.twitter.com/ZGrFXniUWF
— ANI (@ANI) June 3, 2019
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून डोवाल यांचा दर्जा आता कॅबिनेट मंत्र्यांसारखा असेल. डोवाल यांची पुनर्नियुक्ती म्हणजे पंतप्रधान मोदी आणि नवे गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कामावर संतुष्ट असल्याची पावती असल्याचे बोलले जात आहे.
डोवाल यांना २०१४ मध्ये एनएसए करण्यात आले होते. ते भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. डोवाल यांच्या देखरेखीखाली २९ सप्टेंबर २०१६ रोजी पीओकेत सर्जिकल स्ट्राइक आणि यावर्षी २६ फेब्रुवारीला पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केले होते. ऑपरेशन विंगचे प्रमुख म्हणून एक दशक जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी २००४-०५ मध्ये आयबीचे प्रमुख म्हणून काम केले.
डोवाल यांचा जन्म १९४५ मध्ये उत्तराखंडमधील गढवाली परिवारात पौडी गढवालमधील गिरी बानसेल्यून गावात झाला होता. डोवाल यांचे वडील मेजर डी. एन डोवाल हे भारतीय सैन्य दलात अधिकारी होते. डोवाल हे १९६८ च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. डोवाल हे एकमेव असे आयपीएस अधिकारी आहेत जे लष्करी सेवेत नसतानाही त्यांना किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, सोमवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी अजित डोवाल यांच्याबरोबर अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला आयबी प्रमुख राजीव जैन, गृह सचिव राजीव गोबा आदी उपस्थितीत होते.