बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थाना बाहेर धरणे धरलेल्या त्यांच्या सून ऐश्वर्या यांना अखेर सोमवारी सकाळी घरात प्रवेश मिळाला. तत्पूर्वी ऐश्वर्या यांनी आपल्या सासू राबडीदेवी आणि नणंद मिसा भारती यांच्यावर छळ करणे आणि घरातून बाहेर काढण्याचा आरोप केला. तसेच राबडीदेवी यांनीही ऐश्वर्या यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. बिहारच्या सर्वांत मोठ्या राजकीय कुटुंबात रविवारी दुपारी सुरु झालेला 'हाय व्होल्टेज ड्रामा' रात्री उशिरापर्यंत सुरु होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लालप्रसाद यादव यांचे कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत सुनेशी समझोता करण्याच्या प्रयत्नात होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार अखेर सकाळी ऐश्वर्या यांचा घरात प्रवेश झाला. ऐश्वर्या यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करु नये यावरुन सहमती झाल्याचे सांगण्यात येते.
ऐश्वर्या यांचे वडील चंद्रिका राय हेही लालूंच्या घराबाहेर रात्रभर एका खुर्चीवर बसून होते. यावेळी बाचाबाचीही झाली पण ते खुर्चीवरुन उठले नाहीत. मोठ्या अपेक्षेने मुलीचे लग्न लालूंच्या मुलाशी केले होते. मला जराही याची कल्पना असती तर चुकूनही या कुटुंबात मुलीचे लग्न केले नसते, असे हताशपूर्ण वक्तव्य चंद्रिका राय यांनी केले.
'... तर तेलाच्या किंमती कल्पनेपलीकडे भडकतील'
दरम्यान, तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या या राबडीदेवी यांच्या निवासस्थानातून रडत बाहेर जाताना दिसल्या होत्या. तेव्हाच ऐश्वर्या आणि तेजप्रताप यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रविवारी पाटणा येथील राबडीदेवी यांच्या निवासस्थानी मोठा वाद झाला होता. परिस्थिती इतकी बिघडली होती की पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.
मिसा भारती आणि त्यांची आई राबडी यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. ऐश्वर्या यांनी महिला हेल्पलाईनवर तक्रार केली. उलट राबडीदेवी यांनी सून ऐश्वर्या हिच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तर तेजप्रताप हे ड्रग्ज घेत असल्याचा आरोप ऐश्वर्या यांनी केला होता.