पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांच्या सांगण्यावरुन प्रशांत किशोर यांना पक्षात घेतलं: नितीशकुमार

नितीशकुमार आणि प्रशांत किशोर

गेल्या काही दिवसांपासून एनआरसी आणि सीएएवरुन केंद्र सरकारचा विरोध करत असलेले जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांच्याबाबत नितीशकुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात सामील करण्याचा निर्णय भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरुन केल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच ज्यांना जोपर्यंत पक्षात राहावे असे वाटते, तोपर्यंत ते राहू शकतात, असा सल्लाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या प्रशांत किशोर यांना दिला आहे. 

नितीशकुमार यांच्या या वक्तव्यावर प्रशांत किशोर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नितीशजी आता बोलले आहेत. तुम्हाला माझ्या उत्तरासाठी थोडी वाट पाहावी लागेल. मी बिहारमध्ये येऊन याचे उत्तर देईन, असे मत प्रशांत किशोर यांनी नोंदवले आहे. 

तत्पूर्वी, नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्या टि्वटविषयी म्हटले होते की, कोणी टि्वट करत असेल तर त्यांनी खुशाल करावे, त्याच्याशी आमचा काय संबंध. ज्याला जोपर्यंत इच्छा असेल तो पक्षात राहिल. इच्छा नसेल तर तो जाईल. आमचा पक्ष जरा वेगळा आहे. आम्ही सर्वसाधारण लोक आहोत. हा मोठ्या लोकांचा पक्ष नाही. पण आम्ही सर्वांचा सन्मान करतो. 

प्रशांत किशोर यांचे टि्वट भाजपविरोधात असतात, यावर नितीशकुमार म्हणाले, मला अमित शहांनी त्यांना पक्षात घेण्यास सांगितले. आम्ही त्यांना घेतले. जोपर्यंत त्यांना वाटेल तितका काळ ते पक्षात राहतील. ते दुसऱ्या पक्षासाठी कामही करतात. ते जर पक्षात राहू इच्छितात तरी काही अडचण नाही. गेले तरी काही समस्या नाही.