पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरे व्वा! उशिराने का होईना मान्सूनचे केरळमध्ये आगमन

मान्सून पूर्व पाऊस

संपूर्ण देशवासिय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, तो नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. नेहमीपेक्षा उशीराने यंदा पावसाचे केरळमध्ये आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन हे देशात औपचारिकपणे पावसाळ्याची सुरुवात मानली जाते. पुढील चार महिने पाऊस कसा बरसतोय, यावर देशातील शेतकऱ्यांची गणिते अवलंबून असतात. त्याचबरोबर याच पावसावर पिण्याचे पाणीही उपलब्ध होत असते. त्यामुळे पाऊस चांगला पडावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर शनिवारी आगमन झाल्याचे जाहीर केले. केरळच्या अनेक भागांमध्ये शनिवारी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची स्थिती असल्यामुळे मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास यावेळी आठवड्याभराचा उशीर लागला आहे. दरवेळी मेच्या अखेरीस केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होते. यावेळी तो उशीरानेच दाखल झाला आहे. 

येत्या १२ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने याआधीच वर्तविली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात तीव्र उन्हाळा असल्यामुळे सगळेच जण पाऊस कधी सुरू होतोय, याची वाट बघत आहेत. त्यातच गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे तेथील पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. त्याचबरोबर राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. या सगळ्यावर उपाय ठरणारा पाऊस देशात दाखल झाला आहे. आता तो लवकर पुढे सरकावा आणि त्याने धरणीसह सर्वांना चिंब करावे, अशी इच्छा मनोमन सर्व नागरिक व्यक्त करीत आहेत.