पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विक्रम'चा संपर्क तुटलाय, पण ऑर्बिटर अजून चंद्राभोवती कार्यरत!

चांद्रयान २ मोहिम

इस्रोच्या मुख्यालयातील केंद्राशी असलेला विक्रम लँडरचा संपर्क तुटलेला आहे. आता विक्रम लँडरचे नक्की काय झाले, हे अद्याप समजलेले नाही. केवळ लँडरशी असलेला संपर्क तुटला आहे की विक्रम लँडर क्रॅश झाला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे चांद्रयान २ मोहिमेचे सर्व काही संपुष्टात आले असे नाही. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या संदर्भातील माहितीचे विश्लेषण केले जाते आहे, असे इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी शनिवारी पहाटेच जाहीर केले आहे.

शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही अभिनंदनीय - नरेंद्र मोदी

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर आणि त्यासोबत असलेल्या प्रग्यान रोव्हर यांचा संपर्क तुटला आहे. पण चांद्रयान २ मोहिमेतील ऑर्बिटर अद्याप चंद्राभोवती यशस्वीपणे प्रदक्षिणा घालतो आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध कऱण्याच्या अटीवर सांगितले.

ऑर्बिटर पुढील एक वर्ष चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. त्यामुळे या काळात तो चंद्राचे हजारो फोटो घेऊन इस्रोच्या मुख्यालयाकडे पाठवू शकतो. त्याचबरोबर ऑर्बिटर विक्रम लँडरचे फोटो घेऊ शकतो. यामुळे विक्रम लँडरचे नक्की काय झाले हे समजण्यास मदत होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

... अखेर इस्रो प्रमुख के सीवन यांना अश्रू अनावर

चांद्रयान २ मोहिमेमध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत. एक ऑर्बिटर. याचे वजन २३७९ किलोग्रॅम इतके आहे. दुसरा विक्रम लँडर. याचे वजन १४७१ किलोग्रॅम इतके आहे. तिसरा घटक म्हणजे प्रग्यान रोव्हर. याचे वजन २७ किलोग्रॅम इतके आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर प्रग्यान रोव्हर आपले काम सुरू करणार होता.
२२ जुलै रोजी चांद्रयान २ मोहिमेसाठी जीएसएलव्ही प्रक्षेपक अवकाशात झेपावला होता. या मोहिमेसाठी ९७८ कोटी रुपये इतका खर्च आला आहे.