पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफूटी; ३२ नागरिकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश पूर

उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे या राज्यांमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण बेपत्ता झाले आहेत. तर पंजाब, हरयाणा, दिल्लीसह अनेक राज्यात देखील या पावसाचा फटका बसला आहे.

रस्ते, पूल पूरात वाहून गेले 
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे सर्वात जास्त नुकसान हिमाचल प्रदेशचे झाले आहे. याठिकाणी आतापर्यंत १०६५ टक्के पाऊस पडला आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हिमाचल प्रदेशला लागून असलेल्या मोरी ब्लॉक गावात ढगफूटी झाल्यानंतर आलेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या पूरामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक रस्ते, पूल पूरामध्ये वाहून गेले आहेत. त्यामुळे बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचू शकत नाही. पूराच्या पाण्यामुळे अनेकांची घरं वाहून गेली आहेत.

उत्तरकाशीमध्ये १० जणांचा मृत्यू 
दरम्यान, यमुना आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. यमुना नदीवरील हथिनी धरणातून ८.१४ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे हरयाणामध्ये लष्कराच्या जवानांना तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाल्यामुळे उत्तरकाशीच्या पब्बर आणि टोंस नदीला महापूर आला. या पूराचा फटका अनेक गावांना बसला असून १० जणांचा मृत्यू झाला. तर पुढच्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये २२ जणांचा मृत्यू 
हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे दोन नेपाळी नागरिकांसह २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर उत्तराखंडमध्ये ढगफूटीमुळे ३ लोकांचा मृत्यू तर २२ जण बेपत्ता झाले आहेत. पंजाबमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. देहरादूनमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चारधाम मार्गासह १६१ मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे.