पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलेश तिवारी हत्याःमिठाईच्या डब्यावरुन गूढ उलगडलं, तिघे अटकेत

कमलेश तिवारी हत्याःमिठाईच्या डब्यावरुन गूढ उलगडलं, तिघे अटकेत

लखनऊमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या कमलेश तिवारी हत्याकांडाचा २४ तासांच्या आत उत्तर प्रदेश पोलिसांनी उलगडा केला आहे. या हत्येचा कट सूरतमध्ये रचला होता अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. यूपीचे डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले की, कमलेश तिवारी यांचे २०१५ मधील चिथावणीखोर भाषण हेच या हत्येमागचे कारण असून मिठाईच्या डब्यामुळे आरोपींना पकडण्यात यश आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या संशयितांच्या प्रारंभीच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. सूरतमधून ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात असल्याचे ओपी सिंह यांनी सांगितले. कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी मुफ्ती नईम काज्मी आणि मौलाना अन्वरुल हकलाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

पत्रकार परिषदेत डीजीपी म्हणाले की, माहिती आणि पुरावे मिळाल्यानंतर शुक्रवारीच छोटी-छोटी पथके तैनात करण्यात आली होती. आमच्या पथकांना या हत्येचे धागेदोरे गुजरातशी जोडले गेल्याचे लक्षात आले. मिठाईच्या डब्यामुळे जे पुरावे मिळाले त्यानंतर मी स्वतः गुजरातच्या डीजीपींशी बोललो आणि महत्त्वाच्या सूचना मिळवण्यास सुरुवात केली. मिठाईचा डबा सूरत जिल्ह्यातील ज्या दुकानाशी संबंधित होता, त्याच्या आसपासच्या सीसीटीव्हीचे फुटेज पडताळून पाहिले. त्यात संशयित फैजान यूनुस भाईची ओळख पटली. 

एसएसपी लखनऊ आणि स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. गुजरात पोलिस आणि यूपी पोलिसांचे समन्वय चांगले होते. संयुक्त पथकाने सूरतमधून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तिन्ही संशयितांपैकी एक मौलाना मोहसिन शेख सलीम (२४) हा साडीच्या दुकानात काम करतो. दुसरा व्यक्ती फैजान (३०) हा सूरतमधील जिलानी अपार्टमेंटमध्ये राहतो. तर तिसरा रशीद अहमद खुर्शीद अहमद पठाण (२३) हा शिलाई काम करतो. त्याला संगणकाचीही चांगली माहिती आहे. तोही सूरतमध्ये राहतो. या तिघांशिवाय आम्ही दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान, लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. खुर्शीदाबाग येथे दिवसाढवळ्या गोळ्या झाडून कमलेश तिवारींची हत्या करण्यात आली. जखमी झालेल्या कमलेश तिवारी यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्लेखोर कमलेश तिवारी यांना फोन करुन त्यांना भेटण्यासाठी कार्यालयावर आले होते. आरोपींनी सोबत आणलेल्या मिठाईच्या बॉक्समध्ये चाकू आणि बंदूक आणली होती. त्याठिकाणी आरोपींनी चहा प्यायला, त्यानंतर कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करत त्यांच्या शरीरावर चाकूने वार केले. कमलेश तिवारी यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते.