पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्व्हर बिघाडामुळे एअर इंडियाची विमाने उशिराने, हजारो प्रवाशांचे हाल

एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल

आधीच डबघाईला आलेल्या एअर इंडियाच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शनिवारी देश-विदेशातील प्रमुख विमानतळावर एअर इंडियाचे प्रवासी अडकून पडले. शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास सर्व्हर दुरुस्त झाला असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अद्याप नवी दिल्ली, मुंबईसह विविध विमानतळांवर हजारो प्रवासी सकाळी चार ते पाच तास अडकून पडले होते. विमानातून उड्डाण करण्यापूर्वी करावी लागणारी सर्व कामे सर्व्हरमधील बिघाडामुळे रखडली होती. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाची एकूण १५५ विमाने उशिराने उड्डाण करीत आहेत.

शनिवारी सकाळीच सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना बोर्डिंग पास देता येत नव्हते, प्रवाशांची माहिती विमानतळावरील एअर इंडियाच्या कॉम्प्युटरवर दिसत नव्हती, प्रवाशांच्या चेक इन बॅगांची माहिती मिळत नव्हती, त्यामुळे नवी दिल्ली, मुंबईसह जगभरातील विविध विमानतळांवरील एअर इंडियाची विमान वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळाने सर्व्हर सुरू करण्यात यश आले. पण तोपर्यंत विमानतळांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. विविध ठिकाणी जाणारी विमाने विमानतळावरच अडकल्याने इतरही अडचणी निर्माण झाल्या. सकाळपासून सुरू झालेला विलंब दुपारपर्यंत कायम होता. 

एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी म्हणाले, सर्व्हर पुन्हा सुरू झाले आहेत. पण सकाळपासूनच विमाने उशीराने उड्डाण करीत असल्यामुळे शनिवारी संध्याकाळी साडेआठपर्यंत एअर इंडियाची विमाने उशिरानेच उड्डाण करतील. सर्वसाधारणपणे दोन तासांच विलंब असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

एअर इंडियाची चेक इन, बोर्डिंग आणि बॅगेज ट्रॅकिंग यासाठीचे तंत्रज्ञान 'सिता' या कंपनीने विकसित केले आहे. त्यांच्याकडून तांत्रिक सहाय्य पुरवले जाते. विमान उशिराने उड्डाण करीत असल्यामुळे शनिवारी सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:155 Air India flights to be delayed till 830 pm today 18 flights rescheduled after server glitch