पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील १० प्रमुख चेहरे

नरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक चेहरे हे आधीच्या मंत्रिमंडळातील आहेत. आधीच्या काही मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नसले, तरी गेल्या कार्यकाळात चमकदार कामगिरी केलेल्यांना मोदी यांनी पुन्हा संधी दिली आहे. या वेळच्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आता नव्या मंत्रिमंडळात असणार आहेत. 

प्रमुख चेहरे
१. राजनाथ सिंह - राजनाथ सिंह हे गेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते. ते यंदा उत्तर प्रदेशातील लखनऊमधून निवडून आले आहेत.

२. नितीन गडकरी - नितीन गडकरी गेल्या मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी या खात्याचे मंत्री होते. त्यांच्या कामाची प्रशंसा विरोधकांनीही केली होती. नागपूरमधून ते यंदा पुन्हा निवडून आले आहेत.

३. डी व्ही सदानंद गौडा - सदानंद गौडा हे सुद्धा मोदींच्या गेल्या मंत्रिमंडळात सहभागी होते. त्यांच्याकडे आधी रेल्वे आणि नंतर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. ते बंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

४. निर्मला सीतारामन - निर्माला सीतारामन या राज्यसभेच्या सदस्य आहेत. गेल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे संरक्षण या महत्त्वाच्या खात्याचा कार्यभार होता.

५. रामविलास पासवान - गेल्या मंत्रिमंडळात रामविलास पासवान यांच्याकडे ग्राहक व्यवहार आणि संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार होता. ते लोकसभा निवडणुकीला उभे नव्हते. 

६. प्रकाश जावडेकर - प्रकाश जावडेकर हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडे गेल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मनुष्यबळ विकास मंत्रालय होते. 

स्मृती इराणी सर्वात तरुण तर रामविलास पासवान सर्वात वयोवृद्ध मंत्री 

७. रविशंकर प्रसाद - रविशंकर प्रसाद हे लोकसभा निवडणुकीत पाटणासाहिब मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी या मतदारसंघात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला. गेल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे विधी आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार होता.

८. पियुष गोयल - गेल्या मंत्रिमंडळात पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार होता. ते सुद्धा राज्यसभेचे सदस्य आहेत. अरूण जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार शेवटच्या काही महिन्यात देण्यात आला होता.

९. एस. जयशंकर - माजी परराष्ट्र सचिव असलेले एस. जयशंकर यांची मंत्रिमंडळातील वर्णी अनपेक्षित समजली जात आहे. 

१०. स्मृती इराणी - लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधी यांना पाडल्यामुळे स्मृती इराणी चर्चेत आल्या. गेल्या मंत्रिमंडळात त्या वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री होत्या.