Viral News: वाघाला जेवण द्यायला गेला, पण पिंजऱ्याचा दरवाजा बंद करायचा विसरला; पुढं भयंकर घडलं!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: वाघाला जेवण द्यायला गेला, पण पिंजऱ्याचा दरवाजा बंद करायचा विसरला; पुढं भयंकर घडलं!

Viral News: वाघाला जेवण द्यायला गेला, पण पिंजऱ्याचा दरवाजा बंद करायचा विसरला; पुढं भयंकर घडलं!

Dec 11, 2024 07:34 AM IST

प्राणिसंग्रहालयातील एका ५२ वर्षीय कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती वाघाला जेवण देण्यासाठी गेला. मात्र, तो पिंजऱ्याचा दरवाजा बंद करायला विसरल्याने वाघाने त्याच्यावर हल्ला केला. t

वाघाच्या हल्ल्यात प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यू

Tiger Kills Zookeeper: रोमानियातील पिटेस्टी प्राणिसंग्रहालयात एका छोट्याशा चुकीमुळे ५२ वर्षीय कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. मृत व्यक्ती वाघाला अन्न देण्यासाठी गेला होता. मात्र, तो पिंजऱ्याचा सुरक्षा दरवाजा बंद करण्यास विसरला. यानंतर वाघाने त्याच्यावर हल्ला केला. प्राणिसंग्रहालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या भयानक घटनेमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

ही घटना सोमवारी सकाळी घडली. हा कर्मचारी वाघाच्या पिंजऱ्यात त्याला अन्न देण्यासाठी गेला होता. परंतु, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करता त्याने वाघाच्या पिंजऱ्याचा सुरक्षा दरवाजा उघडा ठेवला. जेवण देऊन तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण

बुखारेस्टमधील पिटेस्टी येथे असलेल्या या प्राणिसंग्रहालयात ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.

प्राणिसंग्रहालय प्रशासन शोकाकूळ

या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सुरक्षेच्या नियमांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ही गंभीर मानवी चूक असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी कबुली प्रशासनाने दिली. या घटनेनंतर वाघ सध्या आपल्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर