yuvraj singh and akshay kumar contest loksabha elections from BJP : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. भाजप देखील लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रेटींना तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे, यात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला गुरुदासपूरमधून तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला चंदीगड किंवा दिल्लीतून तिकीट दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. एक दिवस आधी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. मात्र, युवराज सिंगने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीत २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यात लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नावे असण्याची शक्यता आहे. तर काही सेलिब्रिटींना देखील उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने वातावरण तापवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
दरम्यान उमेदवारी बाबत युवराज सिंह याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. तो म्हणाला, "माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही चर्चा चुकीची आहे. सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे ही माझी आवड आहे. हे काम मी यू कॅन विन या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढेही करत राहील.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत युवराज सिंह सनी देओलच्या जागेवरून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर नवज्योतसिंग सिद्धू भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. युवराज सिंगने फेब्रुवारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर युवराज लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना वेग आला. मात्र, युवराज ने हे वृत्त नाकारले आहे.
जिथे युवराज सिंग आणि अक्षय कुमार हे ज्या ठिकाणावरून लढणार आहेत, त्या मतदार संघात भाजपची स्थिति मजबूत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या गुरुदासपूरमध्ये भाजपचा खासदार आहे. तर अभिनेत्री किरण खेर या चंदीगडमधून भाजपच्या खासदार आहेत. या जागांवर भाजपने नेहमीच आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपने यापूर्वीही गुरुदासपूर मतदारसंघातून सेलिब्रिटी उमेदवार उभे केले आहेत. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी गुरदासपूरमधून अनेकदा संसदेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या अभिनेता सनी देओल येथील खासदार आहे. सनी देओलने आता आपण राजकारणासाठी योग्य नसल्याचे सांगत निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.