YS Sharmila joins Congress : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आता लोकसभेच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वच प्रमुख पक्ष आपली ताकद वाढवण्यात गुंतले आहेत. यामध्ये काँग्रेसला आंध्र प्रदेशात मोठं यश आलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करता आपल्या भावासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे.
शर्मिला यांनी आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच, वायएसआर तेलंगण पार्टी हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला.
वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करताना मला खूप आनंद होत आहे. वायएसआर तेलंगणा पक्ष आजपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भाग होणार आहे. काँग्रेस पक्षात जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडेन, असं त्या यावेळी म्हणाल्या. 'राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून पाहणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात माझा सहभाग असेल याचा आनंद आहे, असं शर्मिला म्हणाल्या.
शर्मिला यांचा पक्ष प्रामुख्यानं तेलंगणात कार्यरत होता. मात्र, तेलंगणमध्ये आता काँग्रेस सत्तेवर असून रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदी आहेत. तिथं शर्मिला यांना फारसा राजकीय वाव नाही. त्यामुळं त्यांना आंध्र प्रदेशात सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
वायएसआर यांच्या निधनानंतर व राज्याच्या विभाजनानंतर काँग्रेस आंध्र प्रदेशातून जवळपास हद्दपार झाली आहे. जगनमोहन यांनी वायएसआर यांचा वारसा सांगत राज्यात बस्तान बसवलं आहे. तिथं आता पाय रोवायचे असल्यास वायएसआर यांचा वारसा सांगणारी व्यक्ती उपयुक्त ठरू शकते. जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. त्याचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळं शर्मिला यांना आंध्र प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. जगनमोहन यांना शह देण्यासाठी काँग्रेसनं खेळलेली ही पहिली चाल असल्याचं मानलं जात आहे.