YouTube new rule : थंबनेलमध्ये दिशाभूल करणारे वाक्य लिहाल तर खबरदार; यूट्यूब व्हिडिओ काढून टाकणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  YouTube new rule : थंबनेलमध्ये दिशाभूल करणारे वाक्य लिहाल तर खबरदार; यूट्यूब व्हिडिओ काढून टाकणार

YouTube new rule : थंबनेलमध्ये दिशाभूल करणारे वाक्य लिहाल तर खबरदार; यूट्यूब व्हिडिओ काढून टाकणार

Dec 20, 2024 10:38 PM IST

YouTube new rule - मनोरंजक आणि महितीपूर्ण व्हिडिओचा खजिना असलेल्या यूट्यूबवर व्हिडिओ कंटेंट निर्मात्यांसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहे.

YouTube थंबनेलमध्ये दिशाभूल करणारे वाक्य लिहाल तर कारवाई होणार
YouTube थंबनेलमध्ये दिशाभूल करणारे वाक्य लिहाल तर कारवाई होणार

विविध विषयांवर मनोरंजक आणि महितीपूर्ण व्हिडिओची निर्मिती करून यूट्यूबवर अपलोड करणाऱ्या भारतातील कंटेंट निर्मात्यांसाठी यूट्यूबने नवे नियम जारी केले आहे. यूट्यूबवर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावे यासाठी दिशाभूल करणारे शीर्षक किंवा थंबनेल लिहिणाऱ्यांना नव्या नियमाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात यूट्यूबवर असे प्रकार सर्रास होत असल्याने येथून अपलोड होणाऱ्या कंटेंटवर यूट्यूबचे खास असणार आहे. यूट्यूबची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये नुकतीच ही माहिती दिली आहे. 

थंबनेलद्वारे दिशाभूल करून यूट्यबवर प्रेक्षकसंख्या वाढवणे म्हणजे क्लिकबेटचा गंभीर प्रकार असल्याचे अल्फाबेटचे म्हणणे आहे. असले व्हिडिओ आढळल्यास ते यूट्यूबवरून काढून टाकले जातील, असंही कंपनीनीने जाहीर केले आहे. विशेषत: ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींशी संबंधित व्हिडिओच्या थंबनेल शीर्षकामधून एक प्रकारचे आश्वासन किंवा दावा केलेला असतो. परंतु वास्तवात व्हिडिओ कंटेंटच्या आत तशी सामग्री आढळत नसल्याचे यूट्यूबला दिसून आले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि चालू घडामोडींवरील व्हिडिओवर विशेष लक्ष

क्लिकबॅट व्हिडिओमुळे प्रेक्षकांची दिशाभूल होऊ शकते. ज्यामुळे प्रेक्षकांना फसवल्यासारखे वाटू शकते. विश्वासार्ह माहितीच्या शोधात यूट्यूबवर आलेले प्रेक्षक निराश होऊन पुन्हा यूट्यूबवर येणे टाळू शकतात, असं अल्फाबेटचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आणि चालू घडामोडींवरील व्हिडिओंवर यूट्यूबकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. क्लिकबॅटचा सामना करण्यासाठी यूट्यूबकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याचा हा एक भाग आहे. कंटेंट क्रिएटर्सच्या प्रशिक्षणासाठी यूट्यूबने नुकताच एक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओ थंबनेलला यापुढे सूचना किंवा इशारा न देता यूट्यूबवरून थेट काढले जाणार आहे. 

यूट्यूब नेमकी काय कारवाई करणार?

यूट्यूबच्या या नव्या नियमांतर्गत भ्रामक, दिशाभूल करणारे शीर्षक किंवा थंबनेल असलेले व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून थेट काढून टाकले जाणार आहे. परंतु व्हिडिओ पोस्ट करणारे यूट्यूब चॅनल मात्र बंद करण्यात येणार नाही. व्हिडिओ निर्मात्यांना त्वरित दंड न करता नव्या नियमांचे पालन करण्यासाठी सुधार करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तथापि, ब्रेकिंग न्यूज किंवा चालू घडामोडींची व्याख्या कशी केली किंवा क्लिकबॅट वापरणारे व्हिडिओ कसे शोधले जाईल हे मात्र यूट्यूबने अद्याप स्पष्ट केलेले नाही. शिवाय यूट्यूब चॅनलवरून व्हिडिओ काढून टाकल्यास त्याविरोधात कसे आणि कुठे अपील करावे, याबद्दलचा तपशील यूट्यूबने जारी केलेला नाही.

जुन्या व्हिडिओंवरही होऊ शकते कारवाई

यूट्यूबवर ताज्या अपलोड केलेल्या व्हिडिओंवर अधिक लक्ष असेल. परंतु भ्रामक आणि दिशाभूल करणारे थंबनेल असलेले जुने व्हिडिओ सुद्धा तपासणीच्या कक्षेत येऊ शकतात, असं यूट्यूबने म्हटलं आहे. त्यामुळे व्हिडिओ निर्मात्यांना त्यांच्या मागील व्हिडिओंचे पुनरावलोकन करण्यास आणि नव्या नियमांचे पालन करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अधिकाधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर