आजकाल लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही आपला राग अनावर होतो व गुन्हे करतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये घडला आहे, जिथे एका कंडक्टरने एका प्रवाशाला दारातून बाजुला होण्यास सांगितल्यावर प्रवाशाला इतका राग आला की त्याने बसमधील कंडक्टरवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
हर्ष सिन्हा असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो झारखंडचा रहिवासी आहे. कंडक्टरने त्याला गाडीच्या स्वयंचलित दरवाजापासून दूर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याला राग अनावर झाला व त्याने कंडक्टरवर चाकू हल्ला केला.
बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचे (बीएमटीसी) बस कंडक्टर योगेश (४५) यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हर्ष सिन्हा कंडक्टरवर हल्ला करताना आणि इतर प्रवाशांना धमकावताना दिसत आहेत.
मूळचे झारखंडचे असलेले हर्ष सिन्हा यांना नुकतेच एका बीपीओ कंपनीने कामावरून काढून टाकले आणि ते जवळपास तीन आठवडे बेरोजगार होते. हर्षने पोलिसांना सांगितले की, नोकरी गेल्याने तो निराश आणि अस्वस्थ होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळी आयटीपीएल बसस्टॉपजवळ घडली. तरुण बसच्या दरवाजात उभा राहिल्याने बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. तसेच याचा त्रासही होत होता. त्यामुळे कंडक्टर योगेश यांनी हर्षला बसच्या पायऱ्यांपासून दूर उभे राहण्यास सांगितले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर हर्ष सिन्हा यांनी बॅगमधून चाकू काढून बस कंडक्टरवर वार केले. या हल्ल्यामुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि प्रवासी पळून जाऊ लागले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हर्ष सिन्हा इतर प्रवाशांना धमकावताना दिसत आहे.
तेवढ्यात बसचालक सिद्धलिंगस्वामी यांनी दरवाजा बंद करून बाहेर उडी मारली आणि हर्ष आत अडकला. त्यानंतर गाडीतून पळून जाण्यासाठी त्याने लाथा मारून काचेचे दरवाजे फोडण्यास सुरुवात केली. दरम्यान, लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी धाव घेत आरोपी हर्ष सिन्हा याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंडक्टरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावर तीन-चार ठिकाणी खोल जखमा आहेत.