Viral news : एका तरुणाचे त्याच्या वयाच्या ७ व्या वर्षी अपहरण झाले होते. घरच्यांनी व पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. घरच्यांनी अनेक दिवस त्याच्या आठवणीत काढले. मात्र, त्यांनी आशा सोडली. या घटनेला तीस वर्ष झाले असतांना अचानक अपहरण झालेला मुलगा त्याच्या घरी गेला. त्याला पाहून आधी सर्वांना धक्का बसला. यानंतर सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना गाझियाबादच्या साहिबाबाद जिल्ह्यात घडली आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
१९९३ मध्ये गाझियाबादच्या साहिबाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहीदनगर येथून वयाच्या सातव्या वर्षी अपहरण करण्यात आलेला हा तरुण राजस्थानहून कसाबसा खोडा पोलिस ठाण्यात पोहोचला. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर बुधवारी त्याला पुन्हा आपले कुटुंब सापडले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आले होते.
वीज विभागातून निवृत्त झालेल्या शहीदनगर येथील रहिवासी तुलाराम यांच्या सात वर्षांच्या मुलाचे ८ सप्टेंबर १९९३ रोजी अपहरण झाले होते. त्यावेळी तो त्याच्या बहिणीसह शाळेतून घरी परतत होता. यावेळी रिक्षा टोळीने त्याचे अपहरण केले होते. आरोपींनी खंडणी म्हणून ७ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. पण, त्यांच्याशी कोणीही संपर्क साधला नाही. कुटुंबीयांनी साहिबाबाद पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. ३० वर्षानंतर हा तरुण घरी आल्यावर त्याने त्याच्यावर बेटलेला प्रसंग कथन केला.
यावेळी त्याने सांगितले की, ट्रकचालक त्याला राजस्थानमधील जैसलमेर येथे घेऊन गेले होते. तेथे त्याला एका व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले. तो माणूस मेंढ्या-बकऱ्या पाळायचा आणि त्याला दिवसातून फक्त एक भाकरी द्यायचा. दिवसातून अनेकवेळा त्याला फक्त चहा दिला जात असे. तरुणाने आपल्या घराची आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती देत कुटुंबीयांना शोधाशोध करण्यास सांगितले होते. तब्बल ३० वर्षांनंतर खोडा पोलिसांना त्याच्या घरचा पत्ता मिळाला. भीमसिंग उर्फ राजू ऊर्फ पन्नू असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून त्याला दोन मोठ्या आणि एक लहान बहीण आहे.