मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Aligarh : छतावर चढलेल्या तरुणाचा माकडांच्या हल्ल्यात मृत्यू, घटनेनंतर ग्रामस्थ वानरांच्या दहशतीखाली

Aligarh : छतावर चढलेल्या तरुणाचा माकडांच्या हल्ल्यात मृत्यू, घटनेनंतर ग्रामस्थ वानरांच्या दहशतीखाली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 26, 2023 06:50 PM IST

Aligarh Crime News : माकडांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता नागरिक घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत. त्यानंतर हल्लेखोर वानरांना जेरबंद करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केले आहेत.

Monkey Attack Cases In Aligarh
Monkey Attack Cases In Aligarh (HT)

Monkey Attack Cases In Aligarh : छतावरील साहित्य खाली आणण्यासाठी घरावर चढलेल्या एका तरुणावर माकडांच्या टोळीनं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये ही घटना घडली असून माकडांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वानरांच्या भीतीनं धास्तावलेल्या नागरिकांना घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून अलीगड शहरात माकडांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतानाच आता एका तरुणाला वानरांनी ठार मारल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता प्रशासानं शहरातील माकडांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अलीगड शहरातील अनेक भागांमध्ये हातातील किंवा पिशवीतील खाद्यपदार्थांसाठी माकडांनी स्थानिकांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर शहरातील ऊपरकोर्ट परिसरात राहणाऱ्या माजिद नावाच्या तरुणावर माकडांनी हल्ला केला. तरुणानं आरडाओरड केल्यानंतर लोकांनी छतावर धाव घेतली. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं तरुणाच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही माकडांनी अनेक लोकांवर हल्ले केल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार अर्ज देण्यात आले होते.

परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळंच या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अलीगडमधील धनीपुर मंडी, एटा चुंगी, विकास नगर, रावण टीला, सुरेंद्र नगर, रामघाट रोड, किशनपुर तिराहा, ऊपरकोट, महावीरगंज, बारहद्वारी आणि रघुवीरपुरी या परिसरात माकडांनी धुमाकूळ घातलेला आहे. माकडांच्या भीतीनं लोक घराबाहेर पडायला घाबरत असून त्यानंतर आता प्रशासनानं संपूर्ण शहरातील माकडांना जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

WhatsApp channel