अॅमेझॉनसारख्या प्रसिद्ध कंपनीत मोठ्या पगाराची पार्ट टाईम नोकरी देण्याच्या नावाखाली एका महिलेला खात्यातून १ लाख ९४ हजार रुपये गायब करण्यात आले. कर्नाटकातील उडुपी येथे हा प्रकार घडला. संबंधित महिलेने इन्स्टाग्रामवर पार्ट टाईम नोकरीची जाहिरात पाहिली. चांगला पगार मिळेल, अशा अपेक्षाने महिलेने खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवला आणि तिच्या खात्यातून पैसे गायब झाले.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, अर्चना ही महिला इन्स्टाग्रामवर पार्ट टाइम जॉब शोधत असताना तिला अॅमेझॉनची नोकरी देण्याचा दावा करणारी एक जाहिरात दिसली. कुतूहलाने तिने या जाहिरातीवर क्लिक केले, यानंतर तिला व्हॉट्सअॅप चॅटवर रिडायरेक्ट केले.
सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला रिक्रूटर्स बनवून तिला एक आकर्षक ऑफर दिली. जास्त पगाराच्या नोकरीसाठी महिलेल थोड्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सांगितले. दरम्यान, १८ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध अज्ञात यूपीआय आयडीवर एकूण १ लाख ९४ हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने द स्कॅमर्स मॉडस ऑपरेंडी या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. अशी घटना घडल्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही सायबर गुन्हेगारांनी नोकरी, ऑफर, मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली आहे.