कर्नाटकमधली हुबळीत झालेले नेहा हिरेमथ हत्याकांड ताजे असतानाच आणखी एका तरुणीची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. हुबळीच्या कॉलेजमध्ये २१ वर्षीय नेहाची तिच्याच मित्राने चाकूने वार करून हत्या केली होती. आरोपीने तरुणीला अशाच प्रकारे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तरुणीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र काहीच फायदा झाला नाही. या हत्येनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आरोपीसह संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली नावाच्या तरुणीने प्रेमास नकार दिल्याने गिरीश उर्फ विश्वा याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अंजलीने याप्रकरणी बेंडीगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, गिरीश नावाचा तरुण तिला नेहा हिरेमठ प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देत आहे. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता तिला परत पाठवले.
पहाटेच्या सुमारास घरात घुसून केली अंजली हत्या -
बुधवारी पहाटे आरोपी गिरीश अंजलीच्या घरात घुसला आणि झोपलेल्या अंजलीवर चाकून सपासप वार केले. या हल्ल्यात अंजली जागीच ठार झाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेंडिगेरी पोलीस ठाणे क्षेत्रातील वीरपूर ओनी परिसरात २३ वर्षीय विश्वा उर्फ गिरीश सावंत याने सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अंजली अंबीगेरा हिच्या घराच्या दरवाजा ठोठावला. अंजली स्वत: येऊन घराचा दरवाजा उघडता. तिने दरवाजा उघडताच विश्वाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. अंजली रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
हुबळीचे पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवल्याच्या आरोपात बेंडिगेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रप्पा चिक्कोडी आणि महिला पोलीस कर्मचारी रेखा हवरेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. मृत अंजलीच्या बहिणींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास केला जात आहे. यासाठी दोन विशेष पथके गठित केली असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.
याआधी एप्रिल महिन्यात २१ वर्षीय नेहा हिरेमठ या तरुणीची हुबळी धारवाड़ मध्ये केएलई टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी परिसरात तिचा मित्र फयाज खोंडुनाइक याने चाकूने वार करून हत्या केली होती. नेहा एमसीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच आरोपी फयाज याला अटक केली होती. त्याला जिल्हा मजिस्ट्रेट समोर हजर केले असता त्याची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर सीआयडीने फयाजला ताब्यात घेत तपासा कामी धारवाडहून हुबळीला आणले होते.
संबंधित बातम्या