Kaushal Kishore House Firing Lucknow : मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक सुरू असतानाच उत्तर प्रदेशातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या बंगल्यात तुफान गोळीबार झाला आहे. गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून तो कौशल किशोर यांच्या मुलाचा मित्र असल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीने विकास कौशल यांच्या बंदुकीतून गोळी झाडली असून डोक्याला गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा लखनौचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या लखनौतील बंगल्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विनय श्रीवास्तव असं आरोपीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. लखनौ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती लखनौचे डीसीपी राहुल राज यांनी दिली आहे. पोलिसांनी कौशल किशोर यांच्या बंगल्यातून एक बंदूक जप्त केली असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचंही राहुल राज यांनी म्हटलं आहे.
कौशल किशोर यांच्या बंगल्यात गुरुवारी रात्री एकूण सहा लोक आले होते. सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर अचानक बंगल्यात गोळीबार सुरू झाला. आरोपीने केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांच्या बंदुकीतून गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची चौकशी सुरू केली असून तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं लखनौ पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या