Arvind Kejriwal News : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा देशातील विरोधी पक्षांकडून जोरदार निषेध होत आहे. सामाजिक वर्तुळातून केजरीवाल यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही वर्षांपूर्वी आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण (Prashant Bhushan) व सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे देखील केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. 'राजकारण आणि वैचारिक मतभेद ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, या सर्वांच्या वर लोकशाही व्यवस्था आहे. केजरीवाल यांची अटक ही लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी आहे. केजरीवालांचाच न्याय लावायचा झाला तर इलेक्टोरल बाँडच्या घोटाळ्यात मोदींचं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ तुरुंगात असायला पाहिजे, असं यादव यांनी म्हटलं आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयानं या कारवाईच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, असं आवाहनही यादव यांनी केलं आहे.
प्रशांत भूषण यांनीही केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. 'ही एक प्रकारची थट्टाच आहे. भाजपमधील आपल्या मालकांच्या इशाऱ्यावर ईडीच्या ज्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांकडून निवडणूक बाँडद्वारे पैसे उकळले आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पण इथं सगळं उलट सुरू आहे. केजरीवाल यांच्याविरोधात कोणताही कागदोपत्री पुरावा नसताना या अधिकाऱ्यांनी त्यांना रात्री अटक केली. सरकारचं हे पाऊल धक्कादायक आणि निषेधार्ह आहे, असं भूषण यांनी म्हटलं आहे.
प्रशांत भूषण, योगेंद्र यादव हे आम आदमी पक्षाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत. २०१५ साली पक्षाच्या शिस्तपालन समितीनं या दोघांसोबत प्रा. आनंद कुमार आणि अजित झा यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवला होता. तसंच, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ‘आप’च्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना मारहाण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, आम आदमी पक्षानं हे आरोप फेटाळून लावले होते. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ही परिषद अर्धवट सोडून बाहेर आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा पराभव करण्यासाठी काम केल्याचा आरोप प्रशांत भूषण यांच्यावर होता.