Yesmadam : तुम्ही तणावात आहात का? असं विचारणारा सर्व्हे केला आणि 'हो' म्हणणाऱ्यांना नोकरीवरून काढलं! एचआरचा मेल व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Yesmadam : तुम्ही तणावात आहात का? असं विचारणारा सर्व्हे केला आणि 'हो' म्हणणाऱ्यांना नोकरीवरून काढलं! एचआरचा मेल व्हायरल

Yesmadam : तुम्ही तणावात आहात का? असं विचारणारा सर्व्हे केला आणि 'हो' म्हणणाऱ्यांना नोकरीवरून काढलं! एचआरचा मेल व्हायरल

Dec 09, 2024 04:09 PM IST

Yesmadam : येसमॅडम या स्टार्टअप कंपनीनं केलेल्या एका कारनाम्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियात आहे.

तुम्ही तणावात आहात का? असा सर्व्हे केला आणि नोकरीवरून काढलं! एचआरच्या व्हायरल मेलमुळं वेगळीच चर्चा
तुम्ही तणावात आहात का? असा सर्व्हे केला आणि नोकरीवरून काढलं! एचआरच्या व्हायरल मेलमुळं वेगळीच चर्चा (Representational image)

Yes Madam Employee Fired News : घरच्या घरी ब्युटी सर्व्हिसेस देणाऱ्या येसमॅडम या स्टार्टअप कंपनीची सध्या जोरदार चर्चा आहे. ही चर्चा आहे कंपनीनं केलेल्या विचित्र पद्धतीनं केलेल्या नोकरकपातीमुळं. ‘कामामुळं तुम्ही तणावाखाली आहात का’, असा सर्व्हे करून 'हो' म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं नोकरीतून काढलं आहे.

येसमॅडमच्या एका कर्मचाऱ्यानं लिंक्डइनवर या कथित ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. कंपनीनं नोकरीवरून काढलेल्या १०० कर्मचाऱ्यांमध्ये माझा देखील समावेश आहे, असं या कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे.

'येस मॅडममध्ये चाललंय काय? आधी तुम्ही एक सर्व्हे करता आणि मग आम्हाला रातोरात कामावरून काढून टाकता. कारण काय तर आम्ही तणावाखाली आहोत? केवळ मलाच नाही तर इतर १०० लोकांनाही कामावरून काढून टाकण्यात आलं आहे,' असा संताप या कर्मचाऱ्यानं लिंक्डइनवर व्यक्त केला आहे. हॅशटॅग #massfiring असंही त्यानं यात म्हटलं आहे. पीडित कर्मचाऱ्यानं एचआर एक्झिक्युटिव्हच्या कथित ई-मेलचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. 

'कामामुळं येणाऱ्या मानसिक ताणतणावाबद्दल तुमच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही नुकतंच एक सर्वेक्षण केलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तुमची मतं मांडली. तुमच्या भावनांचा आणि मतांचा आम्ही आदर करतो. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आरोग्यदायी आणि पोषक वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आपल्या अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केला आहे, असं ईमेलमध्ये म्हटलं आहे.

‘कामाचा ताण कोणावरही येऊ नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळंच तणावात असलेल्या कर्मचाऱ्यांपासून फारकत घेण्याचा कठीण निर्णय कंपनीनं घेतला आहे. हा निर्णय तात्काळ लागू होणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं जाईल. आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद,’ असंही पुढं मेलमध्ये म्हटलं आहे.

लिंक्डइनवरील या पोस्टवर ३०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. तसंच, एक्स आणि रेडिटवरही कमेंट्स आल्या आहेत. HT.com ईमेल किंवा लिंक्डइन पोस्टची सत्यता पडताळून पाहू शकत नाही. याबाबत आम्ही कर्मचारी आणि कंपनीशी संपर्क साधला आहे. अद्याप त्यांचा प्रतिसाद आलेला नाही. 

ही घटना खरी आहे की केवळ मार्केटिंग स्टंट आहे, याबद्दलही चर्चा सुरू आहे. 'हा प्रसिद्धीचा स्टंट असेल तर आम्ही खूपच खालच्या थराला पोहोचलो आहेत, असं एका लिंक्डइन युजरनं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

'एचआर तणावाशी संबंधित सर्वेक्षण करते. तणावग्रस्त असल्याचं सांगणाऱ्या प्रत्येकाला काढून टाकते. हे नक्कीच गंभीर असू शकत नाही. हा एखादा जोक किंवा मार्केटिंग गिमिक असावं, असं एक्स वापरकर्ता रवी हांडा यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर