Valley Grammar Viral List: ऑस्ट्रेलियात एका महिला खासदारावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना मेलबर्न येतील एका नामांकित शाळेत काही विद्यार्थ्यांनी तयार केलेली एक यादी सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या यादीत शाळेतील बलात्कार करण्यास योग्य नसलेल्या आणि असलेल्या मुलींची नावे आहेत. ही यादी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 'बलात्कारासाठी योग्य नाही' किंवा 'क्यूटी' अशा शब्दांत विविध श्रेणींमध्ये मुलींची विभागणी या यादीत करण्यात आली आहे. या यादीमुळे संपूर्ण देशात गदारोळ सुरू झाला आहे. शाळा प्रशासनाने पालकांची तातडीची बैठकही घेतली आहे.
द नाईटली या ऑस्ट्रेलियन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यारा व्हॅली ग्रामर या बड्या शाळेतील चार विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार, मुलींची नावे असलेली एक यादी समोर आल्यावर हा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. या यादीत वाईट पद्धतीने विद्यार्थिनींची नावे लिहिण्यात आली आहेत. विद्यार्थिनींची नावे 'वाईफ', 'क्युटीज' आणि 'बलात्कार करण्यासाठी योग्य नाही' अशा पद्धतीने मुलींचे वर्गीकरण या यादीत करण्यात आले आहे.
गेल्या बुधवारी, ही यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिस्कॉर्डवर व्हायरल झाली. तेव्हापासून हा वाद वाढला आहे. शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी मिळून ही यादी तयार केल्याचे बोलले जात आहे. ही बातमी कळताच शाळेत बैठक घेऊन यादी तयार करण्यात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. शाळेचे प्राचार्य डॉ. मार्क मेरी यांनीही या बैठकीला हजेरी लावली.
वृत्तानुसार, चॅनल ९ शी बोलताना डॉ. मेरी म्हणाल्या, ' ही यादी तयार करणे म्हणजे क्रूरता आहे. आमच्या कोणत्याही विद्यार्थ्याबद्दल अशी अनादरपूर्णक वृत्ती निंदनीय आणि खूप भीतीदायक आहे.' 'माझी प्राथमिकता ज्या मुलींना टार्गेट करण्यात आली आहे त्यांना आहे. ही माझी पहिली चिंता आहे. त्याचबरोबर ज्यांनी हे कृत्य केले त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. याला जबाबदार असलेल्या विद्यार्थ्यांच्या निलंबनाचे त्यांनी समर्थन केले आहे. ही यादी तयार करणे 'हे अतिशय घृणास्पद आणि भीतीदायक कृत्य आहे. विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याचा मला आनंद आहे. त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्याबाबत सांगितले आहे.