Accident at Yamuna Expressway : उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील यमुना एक्सप्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगात जाणाऱ्या एका व्होल्वो बसला अचानक आग लागली. यावेळी मागून वेगात येणाऱ्या कारने बसला धडक दिली. यामुले काही वेळातच बस आणि कार दोन्ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून या अपघातात कारमधील चौघांचा जळून मृत्यू झाला.
आज सकाळी ही बस आग्राहून नोएडाला जात होती. ही बस भरधाव वेगात होती. ही गाडी आज सकाळी मथुरा येथील महावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आली असता मथुरा यमुना एक्सप्रेसवे वरील माईलस्टोन ११७ या ठिकाणी या बसला अचानक आग लागली. यामुळे ही बस चालकाने थांबवली. याच वेळी भरधाव वेगात येणारी एक कार ही या बसला येऊन धडकली. यामुळे बस आणि कार दोन्ही वाहनांना आग लागली. कारमध्ये चौघे जण होते. त्यांना बाहेर पडता न आल्याने, कारमधील चौघांचा जळून मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस आणि कार दोन्ही या घटनेत भस्मसात झाले. दरम्यान, बसमध्ये बसलेले काही प्रवासी सुखरूप बाहेर आले. हा अपघात होताच रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबवून आगीत अडकलेल्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने या अपघाताची माहिती ही पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बस मधील सर्व प्रवाशांची सुटका केली. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अपघातामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलासह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बस आणि कारला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाने कशीतरी आग आटोक्यात आणली. या अपघातात जिवंत जळालेल्या लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही.