Passport of India : जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताच्या पासपोर्टची एक स्थानाने घसरण झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार, भारताचा पासपोर्ट हा ८५ व्या रॅंकिंग वर आला आहे. तर जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट हा फ्रान्सचा ठरला आहे. अनेक देशांनी भारतीय नागरिकांना व्हिसा फ्री एंट्रीची घोषणा करूनही क्रमवारीत झालेली घसरण आश्चर्यकारक मानली जात आहे. या यादीत १९९ देशांच्या पासपोर्टची माहिती गोळा करण्यात आला आहे.
शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत फ्रान्सने अव्वल स्थान पटकावले कारण फ्रांसच्या नागरिकांना १९४ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश देण्यात येतो. २०२३ मध्ये भारताच्या या यादीत ८४ वा क्रमांक होता. मात्र या वर्षी यात घट झाली असून आत भारताचा क्रमांक हा ८५ स्थानावर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतीयांना आणखी पाच देशांमध्ये व्हिसा विना प्रवास करता येणार आहे. २०२३ मध्ये, भारतीय ५७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकत होते, तर यावर्षी हा आकडा ६२ वर पोहोचला आहे.
इराण, मलेशिया आणि थायलंडने नुकतीच भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केली होती. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ६ देशांकडे आहेत. यामध्ये जपान, सिंगापूर, स्पेन, फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांचा समावेश आहे. हे रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीवर आधारित आहे. शेजारी देश पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टची क्रमवारी यादीत १०६ आहे. तर बांगलादेश यंदा १०१ ते १०२ पर्यंत पोहोचला आहे. तर मालदीव ५८व्या स्थानावर आहे, ज्याचे नागरिक व्हिसाशिवाय ९६ देशांना भेट देऊ शकतात.
चीनच्या क्रमवारीत काही सुधारणा दिसून आली आहे. २०२३ मध्ये चीन या यादीत ६६ व्या क्रमांकावर होता, जो आता ६४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या पासपोर्ट क्रमवारीतही सुधारणा दिसून आली आहे. यापूर्वी ते ७ व्या स्थानावर होते. २०२४ च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये अमेरिका आता ६ व्या स्थानावर पोहोचली आहे. अमेरिकन १८९ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.