सिंगापूर येथे नववे ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ १४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर हे या संमेलनाचे उदघाटक असणार आहेत. ‘शब्द परिवार’ तर्फे दरवर्षी परदेशात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी माॅरिशस, मलेशिया, बँकॉक, इंडोनेशिया, दुबई, श्रीलंका, मालदीव, नेपाळ आदी देशांत विश्व मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती या संमेलनाचे आयोजक आणि ‘शब्द परिवारा’चे अध्यक्ष संजय सिंगलवार यांनी दिली आहे.
सिंगापूर येथे या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, प्राध्यापकांच्या शोध निबंधांचे सादरीकरण होणार आहे. कवी संमेलनात मान्यवर कवी, कवयित्री सहभागी होणार आहे.
संमेलनात लेखिका रजिया सुलताना यांची मुलाखत ज्येष्ठ कवयित्री शशी डंभारे घेणार आहे. 'सिंगापूर देशाची जडणघडण' या विषयावर सतीश बोरुलकर (मुंबई) यांचे व्याख्यान, 'पुढच्या पिढीच्या दृष्टीने भारत आणि सिंगापूर' या विषयावर सुहानी राणा (दिल्ली), साक्षी डंभारे (मुंबई) आणि अंजली खोडदे (अहमदनगर) यांच्यादरम्यान संवाद आयोजित करण्यात आला आहे.
हे वाचाः साहित्य संमेलनात राजकीय नेते नकोत
‘चपराक’ मासिकाच्या पत्रकार चंद्रलेखा बेलसरे (पुणे) यांचा 'ओव्हरटेक' हा गुढकथा संग्रह, डॉ. अनिल गजभिये (इंदूर) यांचा 'अस्मितादर्शी समीक्षा' हा ग्रंथ, संमेलनाध्यक्ष रजिया सुलताना यांच्या 'गौतम बुद्धांच्या बोधकथा', अर्चना शंभरकर -गाडेकर (उपसंचालक, माहित व जनसंपर्क विभाग) यांच्या 'सरिनास -स्टोरी बोर्ड ' आदी पुस्तकांचे प्रकाशन या संमेलनात होणार असल्याची माहिती सिंगलवार यांनी दिली. संमेलनात सहभागी साहित्यिक आणि रसिकांसाठी सिंगापूर शहराची सफर आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी अभिनेते आणि कवी किशोर कदम, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख , संपादक आणि लेखक संजय आवटे, साहित्यिक डॉ. अनिल गजभिये, लेखक सिद्धार्थ भगत, प्रा. नागनाथ पाटील, लेखक आणि ज्येष्ठ समाजसेवक दगडू लोमटे आदींनी वेगेवगेळ्या देशात भरलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.
डॉ. रजिया सुलताना यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६३ रोजी अमरावती येथे झाला. शिक्षक म्हणून काम करत असताना समाजातील वंचित, शोषित महिलांचे प्रश्न त्यांना खुणावत होते. अमरावती शहरात फ्रेजरपुरा येथे त्यांनी हिंसामुक्त समाज आणि भयमुक्त नारी याकरिता ‘मानव संवाद केंद्र’ सुरू केले. त्या गेले ३० वर्ष कैदी, किन्नर, वेश्या , तृतीय पंथीय यांच्या मानव अधिकार, त्याशिवाय लैंगिक अधिकारावर जनजागृतीचे काम करत आहेत. वर्तमानपत्रातील स्तंभ लेखनाच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. प्रामुख्याने तोंडी तलाक, फतवा, निकाहे हलाल याच्याविरुद्ध मुस्लिम समाजात जनजागृती करण्याचे काम त्या करत आहेत. डॉ. रजिया सुलताना यांची एकूण २९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यातील विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. यामध्ये ‘महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार’, ‘श्रम सेवा पुरस्कार’, ‘हमीद दलवाई स्मृती पुरस्कार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ दिल्ली, ‘झी टीव्ही मराठी या वाहिनीचा पुरस्कार, ’विदर्भ रत्न पुरस्कार' ,'स्मिता पाटील पुरस्कार', इत्यादी पुरस्कार लाभले आहेत.
संबंधित बातम्या