Mamata Banerjee on World cup 2023 final match : नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या भारताच्या पराभवाचं कवित्व अद्याप सुरूच आहे. या पराभवारून राजकीय टीकाटिप्पणीही सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर तिरकस भाष्य केल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पराभवाचं कारण सांगितलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वर्ल्ड कप फायनलमधील पराभवावर भाष्य केलं. त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता किंवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असता, असं त्यांनी म्हटलं आहे.
विश्वचषक स्पर्धेतील फायनल मॅच अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली होती. वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं. स्पर्धा सुरू झाल्यानंतर हळूहळू हा गदारोळ शांत झाला होता. मात्र, आता भारताच्या पराभवानंतर पुन्हा राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे.
'या स्पर्धेत भारतीय संघ चांगला खेळला. सर्व सामने जिंकला, पण काही पापी लोकांनी जिथं हजेरी लावली, तो एकमेव सामना भारतीय संघ हरला, असं ममता म्हणाल्या. शेवटचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामुळं त्यांचा रोख त्यांच्याकडंच असल्याचं स्पष्ट आहे.
भारतीय संघातील खेळाडूंना भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरवण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, खेळाडूंनी त्यास विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला, असा दावाही ममता यांनी केला. टीम इंडियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात निळ्या रंगाची जर्सी घालतात. मात्र, सरावाच्या वेळी त्यांना भगवी जर्सी देण्यात आली होती.
अलीकडंच ममता बॅनर्जी यांनीही सरकारवर क्रिकेटच्या भगवेकरणाचा आरोप केला होता. संपूर्ण देश भगव्या रंगात रंगवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. आम्हाला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे, पण भाजपनं तिथंही भगवा रंग आणला आहे, त्यामुळं आमचे खेळाडू भगव्या रंगाच्या जर्सी घालून सराव करतात. हे मान्य होण्यासारखं नाही, असं त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांच्या आधी अनेक नेत्यांनी वर्ल्डकप फायनल अहमदाबादमध्ये आयोजित केल्याबद्दल टीका केली होती. 'फक्त नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला सामना आपण हरलो. तो वानखेडेवर झाला असता तर भारत जिंकला असता, असं लोक म्हणतात, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हाणला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा ‘पनौती’ असा उल्लेख केला होता. आमची पोरं चांगली खेळत होती. पण 'पनौती'मुळं सामना गेला, अशी जहरी टीका राहुल यांनी केली होती. खासदार महुआ मोईत्रा, बसप खासदार दानिश अली यांनीही यावरून टोलेबाजी केली होती.
संबंधित बातम्या