मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Santishree Pandit : महिला अधिकाऱ्यांमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल; जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांचा विश्वास

Santishree Pandit : महिला अधिकाऱ्यांमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल; जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांचा विश्वास

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 29, 2022 05:55 PM IST

National Defense academy143 rd batch convocation ceremony : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या १४३ व्या तुकडीचा पदवीदान सोहळा आज प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री धूलिपुडी पंडित या उपस्थित होत्या.

National Defense academy143 rd batch convocation ceremony
National Defense academy143 rd batch convocation ceremony

पुणे: ''खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) महिला छात्रांना प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे सशस्त्र दलांची ताकद दुपटीने वाढणार आहे. एनडीए’तून उत्तीर्ण होणाऱ्या छात्रांना भविष्यात पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांच्या तुकड्या हाताळताना लिंगभाव गुणांक हे महत्त्वाचे कौशल्य वापरावे लागणार आहे. त्यासाठी छात्रांनी लिंगभाव संवेदनशीलता (जेंडर सेन्सेटिव्हिटी) आणि सहकार्याची भावना आत्मसात करावी", असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या छात्रांना केले.

ट्रेंडिंग न्यूज

‘एनडीए’च्या १४३ व्या तुकडीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात प्रा. पंडित बोलत होत्या. या प्रसंगी ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल संजीव डोग्रा, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांच्यासह प्रबोधिनीतील प्राध्यापक, प्रशिक्षक या वेळी उपस्थित होते. ‘एनडीए’च्या १४३ व्या तुकडीतील ३०७ छात्रांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. अजय कोचर यांनी प्रास्ताविक केले. ओ. पी. शुक्ला यांनी अकादमीच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

प्रा. शांतिश्री पंडित म्हणाल्या, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल होणारे विद्यार्थी येथील कठीण प्रशिक्षणामुळे नेतृत्वगुण आणि युद्धकौशल्यात माहीर होतात. देशापुढे आज अनेक सामरिक आव्हाने असताना येथून बाहेर पडणारे विद्यार्थी येथील प्रशिक्षणामुळे ही आव्हाने पेलण्यास सक्षम राहणार आहेत. भारताने संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने महत्वाची पावले उचलली आहेत. आजच्या तांत्रिक युगात युद्धप्रणाली बदलत आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आधुनिक आभासी यंत्रणांचा वापर केला जात आहे. प्रबोधिनीची दारे ही मुलींसाठी देखील खुली झाली आहेत. त्यामुळे भविष्यात सशस्त्र दलांना सक्षम महिला अधिकारी मिळणार असल्याची पंडित म्हणाल्या.

कुलगुरू पंडित यांच्या हस्ते ३०७ छात्रांना पदवीप्रदान करण्यात आली. यावर्षी प्रबोधीतून मित्र राष्ट्रांचे १९ विद्यार्थी देखील बाहेर पडणार आहेत. या वर्षी विज्ञान शाखेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि सीओएस ट्रॉफी ही अर्पित कुमार याला प्रदान करण्यात आली. तर बीएससी कॉम्पुटर सायन्स शाखेतून प्रथम आलेल्या आकाश काश्वान याला कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि ऍडमिरल ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. तर कला शाखेत उत्तम कामगिरी करणाऱ्या निशांत शर्मा याला कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि सीएएस ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. बीटेक शाखेत चांगली कामगिरी करणाऱ्या अमर उपाध्याय याला कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि सीआयएससी ट्रॉफी प्रसिडेंटने सन्मानित करण्यात आले. संजीव डोग्रा यांनी आभार मानले.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या