Protest in Iran on Hijab ban: इराणने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हिजाब सक्तीकायद्याच्या कडक अंमलबजावणीवर शिथिलता दिली असली तरी, इराणमधील महिला हिजाब सक्तीला विरोध करत आहेत. हिजाब सक्तीला विरोध करण्यासाठी येथील इस्लामिया विद्यापीठातील एका तरुणीने कपडे काढून आंदोलन केले होते. दरम्यान, आता आणखी एक अशीच घटना उघडकीस आली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मशहदमध्ये ही घटना घडली आहे. येथे एका तरुणीने हिजाब सक्तीचा विरोध करत तिने सर्व कपडे काढून फेकले. यानंतर तिने नग्न अवस्थेत पोलिसांच्या व्हॅनवर चढून धिंगाणा घातला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस महिलेवर ओरडत असतांना दिसत आहेत.
इराणचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मसीह अलीनेजाद यांनी या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये महिला पोलिसांच्या गाडीवर चढून विंडशील्डच्या दिशेने जाताना व दोन्ही पाय पसरून बसलेली दिसत आहे. महिलेची अवस्था पाहून तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाने या प्रकरणी कारवाई करतांना कचरताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी महिलेने हात वर करून निषेध म्हणून आरडाओरडा सुरू केला.
इस्लामिक रिपब्लिक इराणमध्ये महिलांसाठी असलेल्या कडक कायद्याविरोधात या तरुणीने निदर्शने केली होती. यावेळी तिने तिच्या संपूर्ण अंगावरील कपडे काढून ते झाकण्यास नकार दिल्याचे दिसून आले. मात्र, हा गोंधळ वाढल्याने महिलेच्या पतीने सांगितले की, तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक नाही. डिसेंबरमध्ये इराणच्या संसदेने वादग्रस्त 'शुद्धता आणि हिजाब' कायदा संमत केला, ज्यात केस, हात किंवा पाय दाखवणाऱ्या महिला आणि मुलींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. मात्र, महिलांच्या मोठ्या विरोधानंतर इराण सरकारने नतमस्तक होऊन या कायद्याची अंमलबजावणी थांबवली होती. तेव्हा इराण सरकारने त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक जागतिक संघटनांनी इराणच्या कायद्याचा निषेध केला असून हा दडपशाही आणि दडपशाही करणारी व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. प्रस्तावित कायद्यात पुन्हा गुन्हा केल्यास मोठा दंड आणि १५ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद होती.
संबंधित बातम्या