indor woman murder : मध्य प्रदेशातून उत्तराखंडमधील ऋषिकेशपर्यंत पोहोचलेल्या एका रेल्वेची साफसफाई करताना एक प्लास्टिकची पिशवी सापडली. ही पिशवी उघडताच या सफाई कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. रेल्वे यार्डच्या वॉशिंग लाइनमध्ये या पिशवीत महिलेचे कापलेले हात आणि पाय सापडल्याने खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृतदेहाचे उर्वरित भाग मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सापडले आहेत. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे हे ट्रेनमध्ये विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे दोन राज्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही राज्याचे पोलिस आता या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.
योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकावर सोमवारी उज्जैन एक्स्प्रेसच्या बोगीत एका महिलेचे छिन्नविछिन्न अवस्थेत हात व पाय एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जीआरपीने महिलेचे दोन हात आणि पाय ताब्यात घेतले असून फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत.
जीआरपी ऋषिकेशच्या म्हणण्यानुसार, उज्जैन एक्स्प्रेस गेल्या रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास इंदूरहून सुटल्यानंतर योगनगरी ऋषिकेशला पोहोचली. येथील प्रवाशांना उतरवल्यानंतर ही गाडी स्थानकाच्या वॉशिंग यार्डमध्ये हलवण्यात आली.
सोमवारी दुपारी सफाई कर्मचाऱ्यांना वॉशिंग लाईन क्रमांक नऊवर रेल्वेच्या एस-१ आणि एस-२ डब्यांमधील स्वच्छतागृहाजवळ प्लास्टिकची पिशवी पडलेली आढळली. या पिशवीतून खूप उग्र वास येत होता. सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने आरपीएफ आणि जीआरपीला याची माहिती दिली. यानंतर जीआरपीचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही पिशवी उघडल्यावर सर्वांना धक्का बसला. पिशवीत एका महिलेचे दोन हात आणि पाय कापलेले आढळले. तिच्या हातात बांगड्या होत्या. यावरून हे शरीराचे तुकडे एका एका महिलेचे असल्याचे उघड झाले.
डेहराडूनहून आलेल्या फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने घेतले. त्याच्या हात आणि पायांचे नमुने घेऊन त्याचा डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. जीआरपी चौकीचे प्रभारी आनंद गिरी यांनी सांगितले की, ऋषिकेश आणि आसपासच्या स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप तपासण्यात आलेले नाही.
पोलिसांनी महिलेच्या शरीराचे अवयव ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या मृत महिलेची ओळख पटत नाही तोपर्यंत हे तुकडे एम्सच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकेही तयार करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.
जीआरपी पोलिस स्टेशनचे एसएचओ त्रिवेंद्र राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी इंदूर रेल्वे स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनमध्ये एका महिलेचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये आढळून आला होता. महिलेच्या डोक्यापासून कंबरेपर्यंतचा भाग ट्रेनमध्ये ठेवलेल्या ट्रॉली बॅगमध्ये सापडला आणि कमरेच्या खाली असलेला शरीराचा भाग एका पोत्यात सापडला.
महिलेच्या शरीरातून हात व पाय तोडले होते. महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. ऋषिकेशमध्ये सापडलेल्या महिलेचे हात आणि पाय हे इंदूरमध्ये सापडलेल्या महिलेच्या शरीराचे उर्वरित भाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या महिलेची हत्या ऐवढ्या वाईट पद्धतीने का करण्यात आली असावी तसेच आरोपी कोण आहेत ? याचा तपास पोलिस करत आहेत.