Kolkata murder case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण ताज असतांना आता आणखी एक भयंकर हत्याकांड उघडकीस आले आहे. दक्षिण कोलकात्यातील टॉलीगंज भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे कापलेले मुंडके आढळून आले. या महिलेच्या हत्येप्रकरणी २४ तासांच्या आत महिलेच्या दाजीला तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
अतिउर रहमान लास्कर असे आरोपी दाजीचे नाव आहे. त्याने मेहुणीशी शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली. एवढेच नाही तर तिचे मुंडके कापून ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. कोलकाता पोलिसांनी त्याला दक्षिण २४ परगण्यातील डायमंड हार्बरमधील बासुलडांगा या मूळ गावातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूर असलेल्या लस्कर याने गेल्या दोन वर्षांपासून पतीपासून वेगळे राहणाऱ्या त्याच्या मेहुणीची हत्या केल्याची कबुली दिली. डीसीपी (दक्षिण उपनगर) बिदिशा कलिता यांनी सांगितले की, शुक्रवारी ग्रॅहम रोडजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे कापलेले मुंडके आढळले होते. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपासाला सुरवात करत शनिवारी रिजेंट पार्क परिसरातील तलावाजवळ महिलेचे धड आढळले.
ही महिला रिजंट पार्कमधील एका घरात कामाला होती. टॉलीगंजमध्ये काम करणाऱ्या लास्कर यांच्यासोबत ती रोज कामाला जायची. आरोपी दाजीला तिच्याशी शरीर संबंध ठेवायचे होते. मात्र, याला तिने नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने तिची हत्या केली. आठवडाभरापूर्वी खून झालेल्या मेहुणीने आरोपी दाजीपासून लांब राहण्यास सुरुवात केली होती. यामुळे तो अधिकच संतपला होता. महिलेने त्याचा फोन नंबरही ब्लॉक केल्याने त्याच्या रागाचा पारा चढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ती कामावरून घरी परत जात असतांना त्याने तिला जबरदस्तीने एका निर्माणाधीन इमारतीत नेले. या ठिकाणी त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिचे डोके कापले. त्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून फेकून दिले.
या प्रकरणी इतर कुणाची मदत आरोपीने घेतली का ? याचा तपास केला जात आहे. परिसरात कापलेले डोके सापडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. तसेच भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.
शुक्रवारी सकाळी गोल्फ ग्रीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रॅहम रोडवरील टाकीत एका पिशवीत एका महिलेचे मुंडके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच थोड्या वेळानंतर या मृतदेहाचा इतर भाग सापडल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी मृतदेह हा एमआर बांगुर रुग्णालयात पाठवला.
कापलेले मुंडके काचऱ्याच्या ढिगाऱ्यात कोणी टाकले हे शोधण्यासाठी कोलकाता पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. घटनास्थळाशी संबंधित नमुने देखील जप्त करण्यात आले.
कापलेल्या डोक्यावर जखमा आणि रक्ताचे डाग देखील होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यावरून हा खून १२ तासांच्या आत झाला असावा, असे निष्पन्न झाले. मृतदेहाचा इतर भाग शोधण्यासाठी पोलिसांनी स्निफर डॉगची मदत घेतली. कुत्र्याने पोलिसांना ग्रॅहम रोड टाकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका अपार्टमेंटपर्यंत माग काढला. यावेळी आरोपी हा महिलेचा मेहुणा असल्याचं निष्पन्न झालं. त्याला अटक करण्यात आली आहे.