पत्नीने आर्थिक कारणासाठी पतीला किडनी विकण्यासाठी भाग पाडले. तिच्या शब्दाखातर नवऱ्यानं १० लाख रूपयांसाठी किडनी विकली खरी, पण किडनी विकून जे पैसे आले, ते पैसे घेऊन बायको प्रियकरासोबत पसार झाली आहे. मुलीच्या भविष्यासाठी पैसे बँकेत ठेवत असल्याचं सांगत तिने बॉयफ्रेंडसोबत पलायन केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे.
हावडा जिल्ह्यातील संकरैल येथील एका महिलेने पतीला १० लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. पतीची किडनी विकून पैसे मिळाल्यावर ती महिला ते पैसे घेऊन प्रियकरासह पळून गेली.
मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी महिलेने पतीवर दबाव आणला होता. अनेक महिन्यांच्या नकारानंतर अखेर पतीने किडनी विकण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर वर्षभराच्या शोधानंतर त्याला किडनीसाठी खरेदीदार सापडला. आपल्या मुलीला आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल या विचाराने पतीने आपली एक किडनी विकली. पण पत्नीच्या मनात नक्की काय चाललं आहे, त्याबद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. किडनी विकल्यानंतर पतीला १० लाख रुपये मिळाले. त्यानंतर महिलेने पतीला सांगितले की, हे पैसे मुलीच्या नावावर बँकेत ठेवते. मात्र ते पैसे तिने बँकेत न ठेवता ती आपल्या प्रियकरासोबत रोख रक्कम घेऊन पळून गेली.
पती किडनी विकून आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर पडण्याचा विचार करत होता. पण त्याच्या बायकोने तिच्या भविष्यासाठी वेगळीच योजना आखली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेची फेसबुकवर बॅरकपूर येथील एका चित्रकाराशी ओळख झाली. यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये आले.
पत्नी पळून गेल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करून दोघांना शोधून काढले. यानंतर पती आपल्या १० वर्षीय मुलीला घेऊन बॅरकपूरला पोहोचला, मात्र महिलेने घराचे दरवाजे उघडण्यास नकार दिला. महिलेने पतीला धमकावत जे करायचे ते करा असे सांगितले. लवकरच घटस्फोट देणार असल्याचेही महिलेने सांगितले. नवरा संपूर्ण कुटुंबाकडे आणि मुलीसोबत तिला विनवणी करत राहिला, पण त्या महिलेच्या मनाला पाझर फुटला नाही. त्यांच्याशी बोलण्यासाठी ती घराबाहेर ही आली नाही.
भारतात मानवी अवयवांची विक्री १९९४ पासून एका कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. परंतु दात्यांच्या कमतरतेमुळे मानवी अवयवांची विक्री अव्याहतपणे सुरू असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
संबंधित बातम्या