सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर लैला अफशोनकर हिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दुबईतील वर्दळीच्या रस्त्यावर बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर सोन्याचे दागिने ठेवून लैला निघून जाते. त्यानंतर जे घडतं ते सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावणारं आहे.
एक प्रयोग म्हणून अफशोनकर हिनं तिच्याजवळ असलेला सोन्याचा हार आणि झुमके गाडीच्या बोनेटवर ठेवले आणि ती तिथून निघून जाऊन जवळच असलेल्या एका दुकानात थांबली. या कारजवळून अनेक लोक जात होते. मात्र, कुणीही त्या दागिन्यांकडं लक्ष दिलं नाही किंवा ते उचलले नाहीत. अर्ध्या तासानंतरही सोन्याचे दागिने जसेच्या तसे कारच्या बोनेटवर होते.
लैलानं याबाबतचा व्हि़डिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती म्हणते, 'अर्धा तास झाला तरीही कोणीही सोन्याच्या दागिन्यांना हात लावला नाही. आता बोला दुबई हा जगातील सर्वात सुरक्षित देश नाही का?
पाहा व्हिडिओ:
लैलाच्या व्हिडिओला ११ लाखांहून अधिक लाईक्स आणि १५ हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. बहुतेक नेटकऱ्यांनी दुबईतील सुरक्षित वातावरणाचं कौतुक केलं आहे.
'फक्त दुबईमध्येच आपण सोनं असं सार्वजनिक ठिकाणी ठेवू शकता आणि परत आल्यानंतरही ते तिथंच असेल अशी अपेक्षा करू शकता!, असं एका इन्स्टाग्राम युजरनं म्हटलं आहे.
दुसऱ्यानं म्हटलं आहे की, "म्हणूनच दुबई अतुलनीय आहे. सगळीकडं तुम्हाला आदर मिळतो. तिथं शिस्त आहे.
आणखी एका युजरनं म्हटले आहे की, "ते पैगंबरांच्या शिकवणुकीचं पालन करतात. एखाद्याचं सामान चोरलं तर हात कापण्यासारखा नियम तिथं आहे.
काही लोकांनी हा प्रयोग भारतात करावा असं आवाहनही केलं आहे. 'हा प्रयोग भारतातही करा. तुम्हाला दागिनेच काय, ती गाडीही सापडणार नाही, असं एका व्यक्तीनं गंमतीनं लिहिलं असून त्याच्या कमेंटवर १९ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत.
'भारतात तुम्हाला ते सोनं आणि बीएमडब्ल्यू पुन्हा मिळणार नाही,' असं आणखी एकानं म्हटलं आहे.
काही लोकांनी या व्हिडिओच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त केली आहे. एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, कॅमेऱ्याच्या अँगलवरून असं दिसते की लोकांना माहीत आहे की त्यांचं चित्रीकरण केलं जात आहे. आणखी एक जण म्हणातो, ‘हे सगळं नाटक नाही हे आम्हाला कसं कळणार? सगळं कसं व्यवस्थित जमून आलंय.’
इन्फ्लुएन्सरनं आपल्या व्हिडिओमध्ये वांझो ज्वेलरी नावाच्या ब्रँडला टॅग केलं आहे. याचा अर्थ ही एखादी जाहिरातही असू शकते, असं एकानं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या