बिहारच्या सारण जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी मारणारी महिला सात दिवसानंतर जिवंत बाहेर आली आहे. सारणच्या पानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महम्मदपूर गावात ही घटना घडली. गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या महिलेची गावातील एका विहिरीतून जिवंत सुटका करण्यात आली. महिलेला तिच्या माहेरच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. इतके दिवस उपाशी राहिल्याने ती खूप अशक्त झाली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे विहिरीत दोन साप आणि विंचू असूनही त्यांनी महिलेला इजा पोहोचवली नाही.
मीरा देवी (वय ५० वर्ष) असे या महिलेचे नाव असून ती आठवडाभरापूर्वी कौटुंबिक वादातून घरातून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र तिचा काहीच सुगावा लागत नव्हता. नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी काही मुले शेतात बांबू तोडण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांना विहिरीतून विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर मुले घाबरली आणि तेथून पळून गेली. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी घरच्यांना ही गोष्ट सांगितली, त्यानंतर गावकरी तेथे पोहोचले असता विहिरीत एक महिला असल्याचे दिसले.
घाईगडबडीत महिलेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तेव्हा तिची लोकांना समजले की, ही महिला आठ दिवसापासून घरातून बेपत्ता झालेली मीरा देवी आहे. सात दिवस काहीच न खाल्ल्याने ती खूप अशक्त झाली होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सध्या आपल्या माहेरी मशरकच्या गंडामन गावात आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, महिलेच्या पतीने तिच्यावर खूप अत्याचार करत असल्याने महिलेने आठवडाभरापूर्वी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत उडी मारली. पण विहिरीत पाणी कमी असल्याने ती बुडू शकली नाही तर त्यात असलेल्या चिखलात अडकून पडली.
सात दिवस चिखलात अडकून पडत तसेच काहीही न खाता-पिता तिने अखेर जीवनाची लढाई जिंकली. या महिलेला एक मुलगा असून तो बाहेर शिकतो. ज्या विहिरीत महिलेने उडी मारली होती, त्याविहिरीत अनेक साप आणि विंचू होते, असे सांगण्यात येत आहे. पण सापाने तिला काहीच इजा पोहोचवली नाही. तिच्याकडे येणारे साप हुसकावल्यानंतर मार्ग बदलत असत.