सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अनेकाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, याचे नेटीझन्सकडून कौतुकही केले जाते. मात्र सध्या अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला कानात ईअरफोन लावून डान्स करताना दिसत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महिलेने या दर्ग्यात डान्स केल्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महिलेचे हे कृत्य म्हणजे दर्ग्याच्या परंपरेचा अपमान असल्याचं लोकांचं म्हणणे आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला दर्गा परिसरातील झालरा दालनात कानात ईअरफोन लावून गाणी ऐकत उभी असल्याचे दिसत आहेत. अचानक ती गाणी ऐकतानाच थिरकायला लागते.दर्गा कमिटीने परिसरात अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, जे असे व्हिडीओ काढण्यापासून लोकांना रोखतात, पण या महिलेला कोणीही असं करण्यापासून का थांबवलं नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
महिलेचा व्हिडिओ व्हायरल होताच दर्ग्याच्या व्यवस्थापकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, ही महिला कोण आहे,ती कुठून आली याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. अजमेर शरीफ हे मुस्लिम समाजातील १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा सूफी दर्गा आहे, जिथे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मातील लोक जातात. अनेकांचे हे श्रद्धास्थान आहे.