मध्यप्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर एका महिला पोलीस कॉस्टेबलचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार होणार आहे. मागील अनेक वर्षापासून परवानगी मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला (सेक्स चेंज) लिंग परिवर्तन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महिला काँस्टेबलने सेक्स चेंज करण्याची मागणी करणारे पत्र गृह विभागाकडे सोपवले होते. या प्रकरणी विभागाने विधी विभागाचाही सल्ला घेतला होता.
लिंग परिवर्तनाशी संबंधित या प्रकरणी सल्ला मिळाल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यास लिंग परिवर्तन करण्याची परवानगी देण्यात आली. महिला रतलाम जिल्हा पोलीस दलात काँस्टेबल पदावर कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलीस कर्मचारी लहानपणापासूनच ''जेंडर आडेंटिटी डिसऑर्डर'' आजाराने पीडित आहे. मानसोपचार तज्ज्ञांनीही या आजाराची पुष्टी केली आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी महिलेला लिंग परिवर्तन करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने विधीवत पद्धतीने याबाबत गृहविभागाकडे अर्ज केला होता. दरम्यान सेक्स चेंज केल्यानंतर महिला कर्मचारी म्हणून काही लाभांना मुकावे लागणार आहे. गृह विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेला लिंग परिवर्तन केल्यानंतर म्हणजे पुरुष बनल्यानंतर महिला कर्मचाऱ्याच्या रुपात मिळणाऱ्या सुविधा व लाभांपासून वंचित रहावे लागणार आहे.