मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका

Jul 19, 2024 03:55 PM IST

Microsoft Outage : आज जगभरातील मायक्रोसॉफ्ट युजर्सआपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये विंडोजच्या समस्येला सामोरे जात आहेत. खरं तर कॉम्प्युटर आणि लॅपटॉपला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरात कम्प्युटर, लॅपटॉप बंद; बँक आणि विमान सेवेलाही फटका

Microsoft Outage : विंडोज १० च्या जगभरातील युजर्सना आज मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. काम करत असताना अचानक कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बंद पडत आहेत. कम्प्युटरच्या स्क्रीन अचानक निळ्या पडत असून रिस्टार्ट होत आहेत. अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कंपनी क्राउडस्ट्राइकनं जारी केलेल्या एका अपडेटमुळं ही समस्या उद्भवल्याचं सांगितलं जातं. याचा फटका बँका आणि विमान उड्डाणासह जगभरातील सेवांना बसला आहे.

कम्प्युटर युजर्सच्या स्क्रीनवर एक मेसेज येत आहे. 'तुमच्या कम्प्युटरमध्ये प्रॉब्लेम आहे. तो पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, असा संदेश युजर्सना येत आहे. या प्रक्रियेचं वर्णन ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) असं करण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील या समस्येमुळं कंपनीशी संबंधित अनेक सेवांवर परिणाम झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट युजर्सना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?

>> मायक्रोसॉफ्ट ३६०, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट अॅज्युर, मायक्रोसॉफ्ट स्टोअर आणि मायक्रोसॉफ्ट क्लाऊड पॉवर्ड सर्व्हिसेसमध्ये युजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

>> मायक्रोसॉफ्ट ३६५ मध्ये बिघाड झाल्याच्या ९०० हून अधिक बातम्या आल्या आहेत. ७४ टक्के युजर्स मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉगिन करू शकत नाहीत. तर, ३६ टक्के युजर्सना अॅपमध्ये अडचणी येत आहेत. याशिवाय कंपनीशी संबंधित इतर प्लॅटफॉर्मवरही अडचणी येत आहेत.

एअरलाईन्स चेक-इन सिस्टीमही बंद
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचा परिणाम देशभरातील अनेक विमान कंपन्यांवर झाला आहे. या समस्येमुळं इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांची चेक-इन यंत्रणा बंद पडली होती. सकाळी १०.४५ वाजल्यापासून चेक-इन सिस्टीममध्ये जागतिक समस्या निर्माण झाली आहे, असं गोनाऊनं म्हटलं आहे. ही समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी एअरलाइन्स मायक्रोसॉफ्टसोबत काम करत आहेत. दिल्ली विमानतळावरील सूत्रांनी सांगितलं की, टर्मिनल ३ वरील विमान सेवेवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही, परंतु टर्मिनल २ वर त्याचा परिणाम दिसून आला. विमान कंपन्या मॅन्युअल प्रक्रियेचे पालन करत आहेत.

बँकिंग सेवेलाही फटका

मायक्रोसॉफ्टच्या समस्येचा फटका बँकिंग क्षेत्रालाही बसला आहे. कंपनीचा सर्व्हर ठप्प झाल्यानं जगभरातील बँकेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. बँकांचे लॅपटॉप आणि संगणक बंद असल्यानं कोणत्याही व्यवहाराचा आणि इतर सेवांचा वापर सध्या बंद झाला आहे. याचा फटका जगभरातील युजर्सना बसत असल्याचं मायक्रोसॉफ्टनं म्हटलं आहे. शुक्रवारी सकाळी क्लाऊड सेवा विस्कळीत झाल्यानं जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.

काय काळजी घ्याल!

तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपलाही ब्लू स्क्रीन ऑफ डेथची (BSOD) समस्या भेडसावत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. विंडोजच्या बीआयओएस किंवा इतर हार्डवेअर सेटिंग्जशी छेडछाड करू नका. क्राऊडस्ट्राईक यावर तोडगा काढण्याचं काम करत आहे. या संदर्भातील अपडेट लवकरच जारी करण्यात येणार आहे. मल्टी रिस्टार्टनंतर आपली सिस्टिम पुन्हा सुरू होऊ शकते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर