बंगालमधील आर जी कर मेडीकल कॉलेज व रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरण शांत होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. संप करणाऱ्या आंदोलक डॉक्टरांना ममता सरकारने गुरुवारी पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मात्र डॉक्टरांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने काहीच तोडगा निघू शकल्या नाहीत. बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना सरकारने तिसऱ्यांदा चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासंदर्भात संपकरी डॉक्टर ठाम राहिले, यामुळे चर्चा होऊ शकली नाही. ममता बॅनर्जी रिकाम्या खुर्च्यांकडे पाहात राहिल्या व यावेळी त्यांनी राजीनाम्यावर भाष्य केले.
कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून संपावर गेलेल्या कनिष्ठ डॉक्टरांशी सरकार आजही चर्चा करू शकले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी दोन तास वाट पाहिली पण डॉक्टर आले नाहीत. ममता बॅनर्जी यांनी जनतेसाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचेही म्हटले आहे.
जनतेसाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. आर. जी. कर रुग्णालयातील डॉक्टरच्या खून प्रकरणात मलाही न्याय हवा आहे. मी बंगालच्या जनतेची माफी मागते, ज्यांना आशा होती की आरजी कर प्रकरणी सुरू असलेला संप आज मिटेल. दरम्यान, संपावर गेलेल्या डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यास नकार देत बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली होती.
दोन दिवसांपूर्वी संपकरी डॉक्टरांनी मुख्य सचिवांशी बोलण्यास नकार देत मुख्यमंत्र्यांशी चर्चेची मागणी केली होती. त्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी राज्य सचिवालयात मुख्य सचिवांकडे सुमारे अडीच तास वाट पाहिली, पण मुख्य सचिवांच्या ईमेल लासुद्धा प्रतिसाद दिला नाही.
कनिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी आम्ही आज दोन तास वाट पाहिली, पण ते बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. आरजी कर प्रकरणातील कोंडी दूर करण्यासाठी कनिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करण्याचा तीन वेळा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कनिष्ठ डॉक्टरांशी झालेल्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्याशी करू शकलो असतो, परंतु आरजी कर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कनिष्ठ डॉक्टरांसोबतच्या बैठकीचे त्यांच्या मागणीनुसार थेट प्रक्षेपण करता येणार नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलक ज्युनिअर डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. "मी त्यांना माफ करीन कारण आम्ही ज्येष्ठ आहोत. कनिष्ठ डॉक्टरांनी काम बंद केल्याने राज्यभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून सात लाख रुग्ण त्रस्त आहेत, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.