delhi high court judgement on marriage : पत्नीने पुन्हा पुन्हा पतीचे घर सोडून माहेरी निघून जाणे म्हणजे क्रूरता असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणात दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नवऱ्याची कोणतीही चूक नसताना त्याचे घर हे वारंवार सोडून माहेरी निघून जाणे म्हणजे मानसिक क्रूरतेचे लक्षण आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पतीला क्रूरते वागणूक दिल्याबद्दल आणि पत्नीने सोडून दिल्याच्या कारणावरून घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (१) (आय-ए) आणि १३ (१) (आय-बी) अंतर्गत घटस्फोट मंजूर केला आहे.
लाइव्ह लॉ रिपोर्टनुसार, कोर्टाने म्हटले आहे की, "हे एक स्पष्ट प्रकरण आहे. पत्नी तिच्या पतीची कोणतीही चूक नसतांना वेळोवेळी लग्न मोडण्याची धमकी देऊन घर सोडून जात होती. पत्नीने वारंवार अशी भूमिका घेत घरी निघून जाते म्हणजे पतीवर ही मानसिक क्रूरता आहे. "पतीने कोणतेही कारण नसताना पत्नीची ही क्रूरता सहन केली."
यासोबतच विवाहाच्या पवित्र बंधनावरही खंडपीठाने महत्त्वपूर्ण भाष्य केले. एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता, निष्ठेच्या जोरावर संसार फुलतो. परंतु सतत विभक्त होण्याची वारंवार कृती लग्न या विचाराचा पाया उखडून टाकतो आणि यामुळे नात्याचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचे, खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालय म्हटले आहे की, "दूर जाण्याची आणि नातं तोडण्याच्या भाषेमुळे अथवा कृतीमुळे विवाहाचे बंधन तुटते. ते पुन्हा जोडता येत नाही. विश्वास आणि बांधिलकीच्या या नात्यावर कधीही भरून न येणारी जखम आहे."
या जोडप्याचे १९९२ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. यापूर्वी कौटुंबिक न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. पतीने दावा केला की त्याच्या पत्नीही स्वकेंद्रित होती. तसेच तिचा स्वभावही चंचल आणि अस्थिर होता. ती वारंवार घरी जाऊन पतीवर अत्याचार करत असे. पतीने सांगितले की, तिने २०११मध्ये तब्बल ७ ते ८ वेळा त्याला आणि मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती.
कौटुंबिक न्यायालयानंतर पतीने उच्च न्यायालयात दाद मागितली, ती न्यायालयाने मान्य केली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, पतीने कोणतेही क्रूर कृत्य केलेले नाही. खंडपीठाने म्हटले की संपूर्ण पुराव्यावरून असे दिसून येते की पत्नी तिच्या आईच्या वागण्यावर असमाधानी होती, ज्याचा परिमाण त्यांच्या वैवाहिक जीवनावर झाला.
खंडपीठाने म्हटले आहे की, "पतीने सादर केलेले अनेक पुरावे आम्ही पाहिले आहेत. यावरून पत्नीच्या वागण्यामुळे पती हा मानसिक तणावाखाली होता. २० वर्षे एकत्र घालवल्यानंतरही वैवाहिक जीवनात कोणतीही तडजोड आणि मानसिक शांतता नव्हती. पत्नीने पतीला मानसिक त्रास दिल्याने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हणत घटस्फोट मंजूर केला आहे.