उत्तर प्रदेशमधील महराजगंज येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे पंतप्रधान आवास योजनेच्या ११ लाभार्थी महिलांनी पहिला हफ्ता मिळताच बँकेतून पैसे काढून आपल्या प्रियकरांसोबत फरार झाल्या आहेत. या महिलांच्या पतींनी प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे.
हा प्रकार उत्तर प्रदेशमधील महराजगंज जिल्ह्यातील निचलौल ब्लॉक येथील आहे. या ब्लॉकमधील ९ गावातील ११ महिला पीएम आवास योजनेचा पहिला हफ्ता घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पतीला सोडून प्रियकरांसोबत पळून गेल्या आहेत. त्यांच्या पतींनी याबाबत पोलिसात तक्रार करत दुसरा हफ्ता न देण्याची विनंती केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
दरम्यान पत्नी पळून गेल्याने या पतींसोबत दोन अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक म्हणजे अजूनपर्यंत घराचे बांधकाम सुरू न केल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांना नोटीस पाठवले जाऊ शकते. दुसरे म्हणजे प्रशासनाकडून दिलेला हफ्ता वसूल केला जाण्याची भीती आहे. त्यामुळे पीडित पतींनी दुसरा हफ्ता न देण्याची विनंती केली आहे.
महाराजगंज जिल्यातील निचलौल ब्लॉकमधील १०८ गावात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २३५० लाभार्थ्यांना लाभ दिला होता. यामधील जवळपास ९० टक्के हून अधिक लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ब्लॉकमधील ठूठीबारी, शीतलापूर, चटिया, रामनगर, बकुलडिहा, खेसहरा, किशुनपूर आणि मेधौली गावातील ११ महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हफ्ता ४० हजार रुपये जमा झाल्यानंतर सर्व ११ महिला पैसे घेऊन पतींना सोडून आपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्या आहेत. या घटनेनंतर पीडित पती तनावात आहेत व सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारत आहेत. पतींना आशा होती की, पीएम आवास योजनेच्या माध्यमातून त्यांच्या घराचे स्वप्न साकार होईल, मात्र त्यांचा संसारच मोडला आहे.
याआधीही फरार झाल्या आहेत महिला -
महिला योजनेचे पैसे घेऊन पळून गेल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही नगर पंचायत बेलहरा, बंकी, जैदपूर आणि सिद्धौर येथील चार महिला लाभार्थी बँकेतील पैसे घेऊन पळून गेल्या होत्या. आवास योजनेतील पैसे घेऊन या चार महिला आपआपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्या होत्या. नगर पंचायत फतेहपूरमध्येही दोन महिला पीएम शहरी आवास योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यांनी पहिला हफ्ता मिळताच दोन्ही महिला पतींना सोडून पळून गेल्या होत्या.
संबंधित बातम्या