US Election : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीला गाढव विरुद्ध हत्ती सामना का म्हणतात? मोठा मजेशीर आहे किस्सा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  US Election : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीला गाढव विरुद्ध हत्ती सामना का म्हणतात? मोठा मजेशीर आहे किस्सा

US Election : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीला गाढव विरुद्ध हत्ती सामना का म्हणतात? मोठा मजेशीर आहे किस्सा

Nov 05, 2024 04:56 PM IST

US Presidential Election 2024 : रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आहे. याची सुरुवातही १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. हे चिन्ह तयार करण्याचे श्रेय व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांना जाते.

अमेरिकन निवडणुकीत गाढव विरुद्ध हत्ती
अमेरिकन निवडणुकीत गाढव विरुद्ध हत्ती

US Presidential Election 2024:  अमेरिकेतील ऐतिहासिक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत आहे. अमेरिकेतील अर्ली व्होटिंग आणि मेल-इन व्होटिंगवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या इलेक्शन लॅबच्या म्हणण्यानुसार, औपचारिक मतदानापूर्वीच ७.८ दशलक्षांहून अधिक अमेरिकन लोकांनी मतदान केले आहे. सात महत्त्वाच्या राज्यांपैकी पेन्सिल्व्हेनिया १९ इलेक्टोरल कॉलेज मतांसह सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. त्याखालोखाल नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियाला प्रत्येकी १६, मिशिगनला १५ आणि अॅरिझोनाला ११ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. दुसरे महत्त्वाचे राज्य म्हणजे विस्कॉन्सिन १० आणि नेवाडा ६ निर्वाचक मंडळ मते आहेत.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला गाढव आणि हत्ती यांच्यातील लढत असेही म्हटले जाते. त्यामागची कथाही गमतीशीर आहे. खरे तर या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चढाओढ झाली असून दोन्ही पक्षांची चिन्हेही अनुक्रमे हत्ती आणि गाढव आहेत. त्यामुळे याला हत्ती विरुद्ध गाढव अशी स्पर्धा म्हटले जाते. प्रसिद्ध अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नास्ट (१८४०-१९०२) यांना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रबळ पक्षांचे दोन प्राणी म्हणून केलेले चित्रण लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते.

डेमोक्रेटिक पार्टीचे प्रतीक चिन्हे गाढव -

गाढव हे अमेरिकेच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतीक चिन्ह आहे.  १८२८ च्या निवडणुकीत अँड्र्यू जॅक्सन पक्षाचे उमेदवार असताना हे चिन्ह पहिल्यांदा उदयास आले. त्याचे विरोधक त्याला जॅकस म्हणू लागले. स्वत:चा अपमान म्हणून घेण्याऐवजी जॅक्सनने अभिमानाने ते नाव स्वीकारले आणि आपल्या निवडणूक प्रचारात गाढवांचा वापर करण्यास सुरुवात केली. पुढे प्रसिद्ध अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांनी १८७० च्या दशकात 'हार्पर्स वीकली' मासिकासाठी बनवलेल्या आपल्या राजकीय व्यंगचित्रांमध्ये डेमोक्रॅट्ससाठी गाढवांचा वापर करण्यास सुरुवात केली, जी हळूहळू डेमोक्रॅटिक पक्षाचे कायमस्वरूपी प्रतीक बनली. आता हेच गाढव डेमोक्रॅटिक पक्षाच्या साधेपणाचे, कष्टाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

रिपब्लिकन पार्टीचे प्रतीक हत्ती -

हत्ती हा अमेरिकेतील सध्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे प्रतीक आहे. याची सुरुवातही १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली.  या चिन्हाचे श्रेयही  व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांना दिले जाते. ७ नोव्हेंबर १८७४ रोजी 'हार्पर्स वीकली'  मासिकात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रात हत्तीला रिपब्लिकन वोट म्हणून चित्रित केले होते. त्यानंतर त्याला रिपब्लिकनचे प्रतीक बनवण्यात आले. हत्ती हा एक मजबूत, स्थिर आणि वैभवशाली प्राणी आहे, जो रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांचे आणि विचारसरणीचे प्रतीक आहे, हा त्यामागचा मुख्य विचार होता.

जॉन एफ केनेडी आणि निक्सन यांच्याशी संबंधित किस्सा -

एक किस्सा माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याशीही संबंधित आहे. ८ सप्टेंबर १९६० रोजी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ते ओरेगॉन राज्यात निवडणूक प्रचारासाठी आले असता तेथील समर्थकांनी त्यांना घेरले. त्यांचे समर्थक दोन गाढवांना सोबत घेऊन आले, ते पाहून केनेडी यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ते गर्दीतून बाहेर येत समर्थकाजवळ गेले व त्यांनी दोन्ही गाढवांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांचे कौतुक केेले होते. त्याचबरोबर आपल्या भाषणातही केनेडी यांनी त्या समर्थकाचे कौतुक केले. याच निवडणुकीत त्यांचा सामना रिपब्लिकन उमेदवार रिचर्ड निक्सन यांच्याशी झाला होता. ते तिथल्या विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कागदापासून एक मोठा हत्ती बनवण्यात आला होता. निक्सन यांनीही त्याचे खूप कौतुक केले होते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर