मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi : आपल्या तपस्येतच कमी राहिली; पंतप्रधान मोदींनी का मागितली प्रभू रामाची माफी?

Narendra Modi : आपल्या तपस्येतच कमी राहिली; पंतप्रधान मोदींनी का मागितली प्रभू रामाची माफी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 22, 2024 06:13 PM IST

Modi on Ram Mandir : मोदी म्हणाले की, रामलल्ला अयोध्येत परतले आहेत. प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण,हा क्षण हे सगळं आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे.

Modi on Ram Mandir
Modi on Ram Mandir

५०० वर्षापूर्वी कोट्यवधी हिंदूंसाठी जी प्रतीक्षा व संघर्षाचे पर्व सुरू झाले होते ते २२ जानेवारी २०२४ रोजी ८४ सेकंदाच्या अभिजीत मुहूर्तावर पूर्ण झाले. सोमवारी अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न जाली. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना या ऐतिहासिक क्षणाचे महत्व सांगितले तसेच रामलल्लाची माफी मागितली. त्यांनी राम मंदिर निर्माणासाठी झालेल्या विलंबासाठी क्षमा याचना केली.

अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत, असे म्हणताना पंतप्रधान भावुक झाल्याचे दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामलल्ला अयोध्येत परतले आहेत. प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण, हा क्षण हे सगळं आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे.

मोदी म्हणाले की,मी आज प्रभू रामांची माफी मागतो. आमच्याकडून तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकतो नाही. मंदिर निर्माणासाठी खूप विलंब झाला. आज ते पूर्ण झाले. मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील.

WhatsApp channel