मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  narendra modi : ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?; पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्ला

narendra modi : ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?; पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्ला

Jun 07, 2024 06:20 PM IST

narendra modi : एनडीए संसदीय पक्षासमोर केलेल्या पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?; पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्ला
ईव्हीएम जिवंत आहे की मेलं?; पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्ला (PTI)

narendra modi on evm :भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात झाली. यावेळी संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला केला.

ट्रेंडिंग न्यूज

'निवडणुकीचे निकाल आले तेव्हा मला अनेकांचे फोन येत होते. आकडे सांगितले जात होते. मात्र, मी त्यांना एकच प्रश्न विचारला की ईव्हीएम जिवंत आहे की मेलं? कारण भारतीय लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडावा असाच विरोधकांचा प्रयत्न होता. यावेळी मला वाटलं ते ईव्हीएमची अंत्ययात्राच काढतील. मात्र, ४ जूनच्या संध्याकाळी ईव्हीएमनं सगळ्यांना गप्प केलं. ही भारतीय लोकशाहीची, निवडणूक यंत्रणेची ताकद आहे, असं मोदी म्हणाले.

'आता आणखी ५ वर्षे तरी ईव्हीएम विषयी काही ऐकायला मिळणार नाही. २०२९ जवळ आला की पुन्हा चर्चा सुरू होईल. निवडणुकीच्या काळात दर तीन दिवसांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जायचे. ही एकच टोळी होती. आयोगाच्या कामात कसे अडथळे आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरू होते. यांच्या डोक्यात किती नैराश्य भरलं होतं. भारताला बदनाम करण्याच्या कटकारस्थानाचा हा भाग होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही, असं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील इतर ठळक मुद्दे

> माझ्यासाठी एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, आकांक्षी भारत.

> मागची दहा वर्षे हा केवळ ट्रेलर होता. यापुढं देशाच्या विकासासाठी अधिक कठोर आणि जलद काम करू.

> आम्ही 'सर्व पंथ समभाव' (सर्व धर्म समान) या तत्त्वाशी बांधील आहोत.

> एनडीए हा सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांचा गट नाही, तर राष्ट्र प्रथम या तत्त्वाशी बांधिलकी असलेली आघाडी आहे.

> गरीब, मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणाला आमचं प्राधान्य आहे, आम्ही लोकांचं कल्याण करत राहू, सर्वांना दर्जेदार जीवन देत राहू.

> देशात गुंतवणुकीला प्रचंड वाव आहे. सर्व राज्यांनी त्यासाठी पुढं यावं.

> भारताबद्दलचा आदर आणि भारतातील गुंतवणूक या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

> २०२४ च्या लोकसभा निकाल हा एनडीएचा पराभव आहे असं भासवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र देशवासीयांना माहीत आहे की आम्ही हरलो नाही.

> १० वर्षांनंतरही काँग्रेसला १०० चा आकडा गाठता आला नाही; गेल्या तीन लोकसभा निवडणुकांतील त्यांच्या एकूण जागा सुद्धा या निवडणुकीतील आमच्या जागांपेक्षा कमी आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४