INDIA Alliance Bhopal Rally : देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. तीन बैठका झाल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून देशातील अनेक शहरांमध्ये एकत्रित सभा घेण्यात येणार आहे. आगामी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीकडून भोपाळमध्ये जाहीर सभेची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता भोपाळमधील सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबतची घोषणा केली आहे. देशातील विविध वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमांवर प्रवक्ते न पाठवण्याच्या निर्णयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असहमती दर्शवली आहे. त्यामुळं इंडिया आघाडीत काहीही आलबेल नसल्याचं चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्यात इंडिया आघाडीकडून भोपाळमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु आता ती सभा रद्द करण्यात येत असल्याचं माजी मुख्यमंत्री कमलानाथ यांनी जाहीर केलं आहे. भोपाळमधील सभेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. घटकपक्षांच्या बैठकीत ज्यावेळी निर्णय होईल, त्यावेळी या सभेबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेमुळंच सभा रद्द करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत पहिली संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
इंडिया आघाडीच्या रद्द झालेल्या सभेबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, इंडिया आघाडीतील नेत्यांनी सनातन धर्माबाबत जी वक्तव्यं केली आहेत, त्यावरून जनतेत मोठा आक्रोश आहे. लोकांच्या रोषाला घाबरून इंडिया आघाडीने नियोजित सभा रद्द केली असावी, असं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरियाची उपमा देण्यात आली. मध्यप्रदेशात सनातन धर्माचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. लोकांच्या श्रद्धांना धक्का पोहोचवणारं वक्तव्य केल्यामुळंच त्यांनी सभा रद्द केल्याचं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.